(मुंबई / रायगड)
गणेशोत्सवासाठी कोकणाच्या दिशेने निघालेल्या हजारो गणेशभक्तांना गेल्या वर्षी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. माणगाव परिसरात कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. तर गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासात याच परिसरात तब्बल सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहने खोळंबली होती. अवघ्या दहा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल एक तास लागला होता.
गेल्या वर्षीच्या या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगड पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे.
महामार्गाच्या विविध टप्प्यांवर वाहतूक रखडल्यास परिस्थितीनुसार वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत. त्यासाठी कोंडी होण्याची शक्यता असलेल्या प्रमुख ठिकाणांची निश्चिती करून प्रत्येक ठिकाणासाठी पर्यायी मार्गांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे गणेशभक्तांच्या प्रवासात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी रायगड पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्यास वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. महामार्गावरील विविध ठिकाणी कोंडी झाल्यास कोणत्या मार्गाने वाहतूक वळवायची, याची माहिती देण्यात आली आहे.
कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग
- पेणपुढे कोंडी झाल्यास तरणखोप- पेण बायपास-गागोदे-वरसई-पाली फाटामार्गे वाकण असा पर्यायी मार्ग वापरण्यात येणार आहे.
- वडखळ येथे वाहतूक कोंडी झाल्यास पोयनाड-पेझारी-कुईस-नागोठणे-वाकण या मार्गाने वाहतूक वळविण्याचे नियोजन आहे.
- नागोठणे येथे कोंडी झाल्यास वेलशेत-वरवटणे-भिसेखिंड मार्गे वाकण किंवा रोहा मार्गे कोलाड असा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- वाकणपुढे कोंडी झाल्यास पाली-नांदगाव-सुतारवाडी मार्गे कोलाड किंवा निजामपूरमार्गे माणगाव या मार्गांचा वापर करता येणार आहे.
- कोलाड येथे कोंडी निर्माण झाल्यास कोलाड-सुतारवाडी-निजामपूर-माणगाव असा पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे.
- माणगाव येथे कोंडी झाल्यास मोरबा नाका-गोरेगाव मार्गे लोणेरे, तर लोणेरे फाटा येथे कोंडी झाल्यास गोरेगाव-आंबेत-महाड या मार्गाने वाहतूक वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- राजेवाडी फाटा ते पोलादपूरदरम्यान वाहतूक कोंडी झाल्यास टोल फाटा-विन्हेरेमार्गे खेड या पर्यायी मार्गाचा वापर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


