(मुंबई)
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा जोर वाढला आहे. महायुतीतील अनेक नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रचाराचा व्हिडिओ विशेष चर्चेत आला आहे.
मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना, हाताला सलाइन आणि नाकाला ऑक्सिजन पाइप लावलेल्या अवस्थेत छगन भुजबळ यांनी थेट रुग्णालयातूनच प्रचारात सहभाग घेतला. येवला मतदारांना त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करत भावनिक आवाहन केले.
गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीअस्वास्थ्यामुळे भुजबळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रुग्णालयाच्या बेडवरूनच भाषणाचा कागद हातात घेऊन समर्थकांना मतदानासाठी आवाहन केले.
सोशल मीडियावर त्यांच्या या व्हिडिओची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून यामुळे निवडणूक वातावरणाला पोषक गती मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

