(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात दाखल होणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना सुरक्षित व सुकर वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून विविध उपाययोजनांना वेग देण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम दिवस-रात्र सुरू असून, आतापर्यंत सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. गणेश आगमनापूर्वी उर्वरित काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रात्रीच्या वेळी रहदारी तुलनेने कमी असल्याने खड्डे बुजविण्याच्या कामाला अधिक वेग देता येत आहे. त्यामुळे दिवस-रात्र सुरू असलेली ही मोहीम गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला. गणेशोत्सव काळात शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढत असल्याने खड्ड्यांचा प्रश्न वेळेत मार्गी लावण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन संस्थांशी चर्चा सुरू असून, गुरांना पकडून त्यांची देखभाल करण्यासाठी निधी उपलब्ध असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या सुरक्षेचा आणि वाहतुकीचा प्रश्न निर्माण करणाऱ्या मोकाट गुरांच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, हे कामही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे शहरातील मोकाट जनावरांबरोबरच भटक्या कुत्र्यांचा प्रश्नही टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचे नगर परिषदेचे प्रयत्न आहेत. गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहावी आणि पादचाऱ्यांना सुरक्षितपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी रस्त्यावर टेम्पो उभे करून फळभाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साळवी स्टॉप, मंगळवार आठवडाबाजार, शनिवार आठवडाबाजार आणि लक्ष्मीचौक येथील मैदाने बाजारासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
नगर परिषद अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना या पर्यायी जागांची माहिती देत आहेत. मात्र, सूचना करूनही संबंधित विक्रेत्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही, तर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. शहरातील फुटपाथचे सौंदर्यीकरण सुरू असून, हे फुटपाथ नागरिकांच्या वापरासाठी असल्याने व्यापाऱ्यांनी दुकानातील साहित्य रस्त्यावर अथवा फुटपाथवर ठेवू नये, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले. फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र झोन तसेच वाहनतळासाठी स्वतंत्र जागा विकसित करण्याचे कामही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने पादचारी तसेच अन्य वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहने शिस्तबद्धपणे आणि नियोजित ठिकाणीच उभी करावीत, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले. गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करीत आहेत. आवश्यकतेनुसार बैठका घेऊन वाहतूक, स्वच्छता, रस्ते, पार्किंग आणि अन्य मूलभूत सुविधांबाबत नियोजन करण्यात येत आहे.
सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, सभापती प्रिती सुर्वे, राकेश उर्फ बाबा नागवेकर, संतोष उर्फ बंटी कीर, शिवसेना गटनेते दत्तात्रय उर्फ बाळू साळवी आणि भाजपा गटनेते राजू तोडणकर उपस्थित होते. गणेशोत्सव हा रत्नागिरीच्या सार्वजनिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा सण असल्याने यंत्रणांच्या तयारीची खरी परीक्षा प्रत्यक्ष गर्दीच्या काळात होणार आहे. खड्डे बुजविणे, मोकाट जनावरांना आळा घालणे, फेरीवाल्यांचे नियोजन आणि पार्किंगची शिस्त या उपाययोजना केवळ उत्सवापुरत्या मर्यादित न राहता वर्षभर प्रभावीपणे राबविल्या गेल्या, तरच शहरातील नागरिकांना त्याचा कायमस्वरूपी दिलासा मिळू शकणार आहे.


