(सना / येमेन)
येमेनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेल्या भारतीय नर्स निमिषा प्रिया हिच्यासाठी मिळालेला काही तासांचा दिलासा आता पुन्हा अनिश्चिततेत गेला आहे. पीडित तलाल अब्दो मेहदी यांच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा ‘ब्लड मनी’ (दीयत/नुकसानभरपाई) स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
तलाल मेहदी याच्यावर निमिषा प्रिया हिचा छळ करून तिचा पासपोर्ट बळजबरीने घेतल्याचा आरोप होता. हा पासपोर्ट परत मिळवण्यासाठी निमिषाने त्याला ड्रग्ज दिले होते, मात्र त्याच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. या प्रकरणात येमेन न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
काल 16 जुलै 2025 रोजी शिक्षा अंमलात येणार होती. मात्र केरळचे ग्रँड मुफ्ती अबू बकर मुसलियार यांच्या मध्यस्थीमुळे शिक्षेची अंमलबजावणी काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली. या कालावधीत निमिषा प्रिया हिच्या वकिलांना व कुटुंबीयांना पीडित कुटुंबीयांना ‘ब्लड मनी’ स्वीकारण्यास राजी करण्यासाठी संधी देण्यात आली.
“माफी नाही, फाशीच हवी” – तलालचे बंधू
तलाल यांचे बंधू अब्देलफतह मेहदी यांनी सांगितले की, “आमच्या कुटुंबाने तडजोडीचे सर्व प्रस्ताव नाकारले आहेत. भावाच्या मारेकऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. हा गंभीर गुन्हा आहे आणि यामध्ये माफी शक्य नाही.” फेसबुकवरील एका दीर्घ पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “तडजोडीचे अनेक प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत. आमच्यावर दबाव टाकला गेला, पण आमच्या भूमिकेत कोणताही बदल झाला नाही. आमची एकच मागणी आहे ती म्हणजे फाशीची शिक्षा तात्काळ दिली जावी.”
बीबीसीच्या अरबी सेवेला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी हीच भूमिका पुन्हा मांडली. “हत्येचा सौदा होत नाही. शिक्षा पुढे ढकलली गेली तरी आम्ही विचलित होणार नाही. आम्ही न्यायासाठी उभे आहोत, आणि वेळ लागला तरी चालेल, देव आमच्या बाजूने आहे,” असे ते म्हणाले.
येमेनच्या न्यायव्यवस्थेनुसार, हत्या झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी नुकसानभरपाई स्वीकारल्यास दोषीची फाशीची शिक्षा रद्द होऊ शकते. त्यालाच ‘ब्लड मनी’ किंवा ‘दीयत’ म्हणतात. मात्र, तलालच्या कुटुंबीयांनी हा पर्याय पूर्णतः फेटाळल्याने निमिषा प्रियाची सुटका सध्या तरी अशक्य असल्याचे चित्र आहे.