(संगमेश्वर / एजाज पटेल)
राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. देवरुख आगाराच्या एमएच १४ एलएक्स ७१४२ क्रमांकाच्या एसटी बसच्या बॅटरी कक्षात अवघ्या ४२ दिवसांत दुसऱ्यांदा स्फोट झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पहिल्या घटनेनंतरही बसमधील तांत्रिक दोष कायम राहिल्याचा आरोप होत असून, एसटी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
माहितीनुसार, १४ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास संगमेश्वर आगारात उभी असलेल्या देवडे- बोरिवली मार्गावरील या बसच्या बॅटरी कक्षात अचानक मोठा स्फोट झाला होता. स्फोटानंतर धूर आणि बॅटरीतील रासायनिक द्रव्य बाहेर पडल्याने परिसरात घबराट निर्माण झाली होती. चालक आणि वाहक यांनी प्रसंगावधान राखत तातडीने वीज जोडणी खंडित केल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली होती.
या घटनेनंतर बसमधील तांत्रिक दोष पूर्णपणे दूर करण्यात येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्यानंतरही हीच बस पुन्हा सेवेत दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, २५ जुलैच्या मध्यरात्री २६ जुलै रोजी पहाटे १.१० वाजण्याच्या सुमारास, धामणी रेल्वे स्थानक परिसरात दिवा-रत्नागिरी पॅसेंजरने आलेल्या प्रवाशांना घेण्यासाठी उभी असताना याच बसच्या बॅटरी कक्षात पुन्हा एकदा मोठा स्फोट झाला. मध्यरात्री झालेल्या या घटनेमुळे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली.
रासायनिक द्रव्याची गळती; गंभीर धोका
दोन्ही घटनांमध्ये स्फोटानंतर बॅटरी कक्षातून ॲसिडसदृश रासायनिक द्रव्य मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. हे द्रव्य जमिनीवर सांडल्याने सिमेंट व डांबरी पृष्ठभागावर पांढरे डाग पडल्याचेही दिसून आले. हे रासायनिक द्रव्य एखाद्या प्रवाशाच्या अंगावर किंवा डोळ्यांवर उडाले असते, तर गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
सुदैवाने दुसऱ्या घटनेच्या वेळी प्रवासी बसमध्ये चढलेले नव्हते. स्फोट होताच वाहकाने तत्काळ प्रवाशांना बसमध्ये चढण्यास मज्जाव केला. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. मात्र, रेल्वेने आलेल्या महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मध्यरात्री बराच वेळ पर्यायी व्यवस्थेची प्रतीक्षा करावी लागली.
एकाच बसमध्ये अवघ्या ४२ दिवसांत दोनदा स्फोट होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया प्रवासी आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पहिल्या स्फोटानंतर बसची योग्य दुरुस्ती करण्यात आली होती का? तांत्रिक तपासणीचा अहवाल काय होता? संभाव्य धोका असतानाही बस पुन्हा सेवेत कशी दाखल करण्यात आली? अशा प्रश्नांची उत्तरे एसटी प्रशासनाने देण्याची मागणी होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच एमएच १४ एलएक्स ७१४२ क्रमांकाची बस तातडीने सेवेतून बाजूला काढून तिची सखोल तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून केली जात आहे. राज्याच्या परिवहन विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

