( संगमेश्वर / प्रतिनिधी )
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठामध्ये कार्यरत कनिष्ठ सांशोधन सहाय्यक सौ. शिल्पा प्रदीपकुमार नाईक यांनी राजस्थान मधील महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, उदयपूर येथून कृषिविद्या विषयात पीएच. डी पदवी नुकतीच प्राप्त केली.
या कृषि विद्यापीठातील कृषिविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. पी. सी. चापलोट यांच्या मार्गदर्शनाखली त्यांनी “महाराष्ट्रातील कोकण विभागासाठी भात चवळी पीकपध्दतीतील सेंद्रीय अन्नद्रव्य व्यवस्थापन” याविषयावर संशोधन केले. या संशोधन अभ्यासात त्यांना डॉ. बाळासाहेब कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे तत्कालीन शिक्षण संचालक आणि आताचे राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पी. एस. बोडके यांचे सहमार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन लाभले. डॉ. बाळासाहेब कोकण कृषि विद्यापीठाच्या सेवातंर्गत प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत त्यांची पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्याबाहेर प्रवेश घेण्याच्या अटीवर निवड झाली होती. त्यानुसार त्यांनी उदयपूर येथील कृषि विद्यापीठात प्रवेश घेऊन हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
डॉ. सौ. शिल्पा यांनी कृषि महाविद्यालय, दापोली येथून १९९४ साली बी. एस्सी. (कृषि) ही पदवी प्राप्त केल्यानंतर १९९६ पासून कृषि विद्या विभागात कृषि पर्यवेक्षक म्हणून नोकरीची सुरूवात केली. तिथपासून आजपर्यंत त्यांनी विद्यापीठात विविध पदावर काम केले. विद्यापीठाच्या सेवातंर्गत प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत त्यांनी कृषिविद्या विषयात सन २०१८ मध्ये एम. एस्सी. (कृषि) पदवी प्राप्त केली. त्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदावर त्यांना बढती मिळाली.त्यांनी त्यांच्या सेवाकाळात शिक्षण संशोधन आणि विस्तार शिक्षण अशी तिनही प्रकारची कामे केलीत. त्यांनी बागकाम तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिकवले. निम्नस्तर कृषि अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी पर्यवेक्षक म्हणून तसेच या अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या उत्तर पत्रिकांचे मूल्यमापन करण्याचे कामही केले.
विस्तार शिक्षण विभागाच्या संशोधन उपयोजनेमध्ये काम करीत असताना त्यांनी विविध संशोधन प्रकल्पांच्या प्रश्नावली तयार करणे, माहिती संकलन करणे, माहितीचे विश्लेषण करणे इत्यादी कामे पार पाडलीत. विस्तार शिक्षणातील त्यांचे योगदान कौतुकास्पद आहे. उद्यानविद्या विभागात काम करीत असताना तेथे भेट देणारे शेतकरी, विद्यार्थी, पर्यटक यांना त्यांनी मार्गदर्शन केले. पालवी एक अनोखा उत्सव या कार्यक्रमात विदेशी फळे भाजीपाला प्रदर्शन, पुष्परचना प्रदर्शन या कार्यक्रमाच्या आयोजनातही सहभाग घेतला. त्यांनी बचत गटांना तसेच इतर महिलांना फळप्रक्रिया आणि नाचणी प्रक्रिया विषयक वर्गामध्ये तज्ञ प्रशिक्षक म्हणून प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन केले. त्यांतील काही महिलांनी पुढे जात व्यावसायिक तत्वार आपला नाचणी प्रक्रिया पदार्थाचा व्यवसायही सुरू केला आहे. त्यांनी विद्यापीठातर्फे दापोली येथे आयोजित रानभाज्या आणि त्यांच्या पाककृती प्रदर्शनातही सक्रिय सहभाग घेतला. ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमात कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहिले.
त्यांनी आतापर्यंत तीन तांत्रिक लेख आणि शेतकऱ्यांसाठी २४ माहितीपर लेख प्रसिध्द केले आहेस. त्याचप्रमाणे दूरचित्रवणीवरील पाच कार्यक्रमात सहभाग घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. तसेच त्यांनी दोन आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रांमध्येही सहभाग घेतला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरील दोन प्रशिक्षणे यशस्वीरित्या पूर्ण केली. याबरोबरच त्यांनी आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी समूह गीत गायन, रांगोळी, रस्सीखेच, लगोरी, दोरीवरील उडया, बॅडमिंटन, शिडीच्या सहाय्याने नारळावर चढणे यासारख्या स्पर्धामध्ये भाग घेतला.
विशेष बाब म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषदेने श्रीलंका येथे आयोजित केलेल्या कवी संमेलनात सादर केलेल्या स्वरचित कवितेला बक्षीस देऊन त्यांना गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे कोकण मराठी साहित्य परिषदेने त्यांना “कवी रमाकांत कीर स्मृति पुरस्कार” देऊन सन्माति केले. विस्तार शिक्षण कार्यातील योगदाना बद्दलही त्यांना “नवदुर्गा सन्मान पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला.त्यांनी प्रत्येक वेळी मिळेल त्या संधीतून नवीन काहीतरी शिकण्याचा अणि ते ज्ञान इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. वयाच्या पन्नाशीनंतर डॉक्टरेट करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय आणि तेही राजस्थान येथील कृषि विद्यापीठात जाऊन, हा निर्णय हेच दर्शवितो की, सातत्याने काहीतरी नवीन शिकायचे आहे आणि शिकण्यासाठी वयाच्या मर्यादा नसतात.

