( रत्नागिरी )
रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे केवळ एक सरकारी कार्यालय नसून उत्कृष्ट व्यवस्थापन, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि पारदर्शक प्रशासन यांचे आदर्श उदाहरण ठरले आहे. येथील स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि नागरिकाभिमुख सेवा पाहून महाराष्ट्रातील सेवानिवृत्त वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांनी दाद दिली. असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय महाराष्ट्रात क्वचितच पाहायला मिळते. शासनाने या कार्यालयाला आयएसओ मानांकन द्यावे,” अशी मागणी या मान्यवर अधिकाऱ्यांनी केली.
राज्यातील तब्बल २० सेवानिवृत्त परिवहन आयुक्त, अपर आयुक्त आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी रत्नागिरी आरटीओ कार्यालयाला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. राज्य शासनाच्या ‘१०० दिवसांच्या कार्यक्रमात प्रथम क्रमांक’ पटकावणारे हेच कार्यालय असल्याने या भेटीकडे विशेष लक्ष वेधले गेले होते.
पाहुण्यांचे स्वागत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे आणि सहाय्यक आरटीओ अजित ताम्हणकर यांनी केले. पाहुण्यांमध्ये माजी परिवहन आयुक्त दिलीप जाधव, माजी अपर आयुक्त शिरीष ठाकूर, सतीश सहस्त्रबुद्धे, प्रसाद महाजन, एल.पी. खाडे, एस.के. पाचरणे, अमरेंद्र पाठक, जितेंद्र पाटील, संजय राऊत, प्रकाश जाधव, विलास कांबळे, अशोक शिंदे, सुबोध मेडसीकर, योगेश बाग, कमलेश चव्हाण, सतीश साळवी, रुक्मणीकांत कळमणकर, राजेंद्र झेंडे, चंद्रकांत जवळकर, मारुती पाटील, मोहन जाधव आदींचा समावेश होता.
माजी परिवहन आयुक्त दिलीप जाधव यांनी सांगितले की, पूर्वी आरटीओ कार्यालयाकडे आवश्यक साधनसंपत्ती नव्हती; परंतु आता रत्नागिरी आरटीओ कार्यालय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. येथील तंत्रज्ञानाधारित कार्यपद्धती, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकसेवेचा दर्जा पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत. या भेटीदरम्यान सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढवले. लवकरच या अधिकाऱ्यांची समिती शासनाकडे रत्नागिरी आरटीओ कार्यालयाला आयएसओ मानांकन देण्याची शिफारस करणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजवर्धन करपे यांनी केले, तर मनोगत आणि आभारप्रदर्शन अजित ताम्हणकर यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्ह्यातील मोटार ट्रेनिंग केंद्राच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

