(रत्नागिरी / वार्ताहर)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवसैनिकांनी मंदिरात दुग्धाभिषेक, वृक्षारोपण तसेच गरजू मुलांना धान्य व मिष्टान्न वाटप करून वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री देव काशी विश्वेश्वर मंदिरात धार्मिक विधींनी झाली. उद्धव ठाकरे यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, यासाठी शिवसेनेच्या वतीने शिवलिंगावर दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर शिवाजीनगर येथील आयटीआय लिंक रोड परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्पही शिवसैनिकांनी केला.
याचबरोबर शहरालगतच्या ‘आशादीप’ संस्थेत गरजू मुलांना जीवनावश्यक धान्य तसेच मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे संस्थेतील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
या कार्यक्रमाला शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, किरण तोडणकर, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, विभागप्रमुख राजन शेटे, संदेश भिसे, राजाराम रहाटे, सिद्धेश्वर कोळी, तन्वीर मुजावर, पारस खानविलकर, अभय गुरव, सचिन सावंत देसाई, योगेश कोरगावकर, सर्फराज शेख तसेच वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंदार वारेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक सायली पवार, तालुका संघटक ममता जोशी, मिताली पवार, सौ. पवार, शहर संघटक सेजल बोराटे, नगरसेविका फौजिया मुजावर, ज्येष्ठ पत्रकार व लेखिका मेघना कोल्हटकर, प्रतिमा साळुंखे आणि स्मिताली नार्वेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय परिसरातील ज्येष्ठ नागरिक परमार, काटीकर, बिजापुरी तसेच शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

