(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरीतील रिक्षाचालक मंगेश अशोक भोई यांनी आपल्या प्रामाणिकपणाचे अनोखे उदाहरण सादर करत रिक्षामध्ये विसरलेली, सुमारे तीन लाख रुपये किमतीची सोन्याचे दागिने असलेली बॅग मूळ मालकिणीपर्यंत सुखरूप पोहोचवली. भोई यांच्या या वर्तनाचे रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.
बुधवारी सायंकाळी मुंबईहून आलेल्या सुकन्या रत्नदीप मिरजूळकर या गवळीवाडा परिसरात जाण्यासाठी रिक्षा घेतली होती. प्रवासादरम्यान त्यांची सोन्याच्या दागिन्यांची बॅग चुकून रिक्षामध्येच राहून गेली. बॅग हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ शहर पोलिस ठाण्यात संपर्क साधला.
याप्रसंगी हेडकॉन्स्टेबल अनुप पाटील, डिटेक्शनचे सहाय्यक फौजदार साळवी, वाहतूक पोलिस नितीन जाधवर, तसेच रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संतोष सावंत यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधमोहीम सुरु केली. काही वेळातच मंगेश भोई यांच्या रिक्षामध्ये बॅग राहिल्याचे स्पष्ट झाले.
भोई यांनी कुठलाही वेळ न दवडता बॅग थेट पोलिस स्थानकात आणली आणि सुकन्या मिरजूळकर यांच्याकडे पोलिसांच्या उपस्थितीत ती सुपूर्त केली. बॅग परत मिळाल्याने मिरजूळकर यांचे समाधान आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता.
या घटनेमुळे रिक्षाचालक मंगेश भोई यांचे प्रामाणिकपण सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे. पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करत समाजात सकारात्मकतेचा संदेश दिला.

