(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दीड दिवसांच्या पाहुण्या म्हणून माहेरवाशिणीच्या लाडाने घरोघरी विराजमान झालेल्या गौरीचे पूजन शुक्रवारी (दि. १८) जिल्ह्यात पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात करण्यात आले. गौरीच्या आगमनापासूनच घराघरांत सुरू झालेली लगबग पूजनाच्या दिवशी अधिकच वाढली. धनधान्य, फळांनी भरलेले सूप, विविध पक्वान्नांचा नैवेद्य आणि पारंपरिक पूजा-अर्चेने गौराईचे यथोचित स्वागत करण्यात आले.
गुरुवारी दुपारनंतर पाणवठ्यावरून प्रतीकात्मक खड्यांची गौरी आणि मुखवटे घरी आणण्यात आले. त्यानंतर गौरीला आकर्षक पद्धतीने सजवून गणपतीबाप्पाच्या शेजारी तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यामुळे घरोघरी गौरी स्वागताचा सोहळा उत्साहात रंगला. आगमनाच्या दिवशी गौरीसमोर भाजी-भाकरीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. यंदा गणपतीबाप्पाचे आगमन पूर्वा नक्षत्राऐवजी उत्तरा नक्षत्रात झाल्याने नवविवाहितांचे पारंपरिक ओवसे झाले नाहीत. मात्र, या पार्श्वभूमीवरही गौरीपूजनाच्या परंपरेत कुठलीही उणीव भासू नये, याची काळजी महिलांनी घेतली. सालाबादप्रमाणे धनधान्य आणि विविध फळांनी भरलेले सूप गौरीसमोर ठेवून पूजा करण्यात आली.
गौराईच्या नैवेद्यासाठी घराघरांत विविध खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. १६ प्रकारच्या भाज्या, पुरणपोळी, खीर यांसह विविध पक्वान्नांचा घाट घालण्यात आला होता. करंज्या, लाडू, पुऱ्या, शंकरपाळ्या, मिठाई अशा फराळाच्या पदार्थांनीही गौरीची ओटी आणि नैवेद्य सजला. गौरीपूजनानिमित्त आप्तेष्टांना निमंत्रित करून अनेक घरांत खास भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी शहरी तसेच ग्रामीण भागात भाविकांची सायंकाळपर्यंत मोठी लगबग सुरू होती. घरी आलेल्या पाहुण्यांचे औक्षण करून त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. दर्शनासाठी आलेल्या आप्तस्वकीय, मित्रमंडळी आणि नातेवाईकांना पेढा, फराळ देत आदरातिथ्य करण्यात आले. त्यामुळे घरोघरी सणासुदीचा आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
फुगड्या-झिम्म्याने रंगली रात्र
गौरीपूजनानिमित्त रात्री महिलांनी पारंपरिक फुगड्या, झिम्मा आणि गौरीची गाणी म्हणत उत्सवाला सांस्कृतिक रंग दिला. लहान मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनी या पारंपरिक खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. फुगड्यांच्या फेरांमध्ये आणि गौरीच्या गीतांमध्ये रमलेल्या महिलांमुळे अनेक घरांमध्ये रात्री उशिरापर्यंत उत्साहाचे वातावरण कायम होते. श्रद्धा, परंपरा आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचा संगम घडविणारा गौरीपूजन सोहळा अशा प्रकारे जिल्ह्यात उत्साहात पार पडला.


