(राजापूर / तुषार पाचलकर)
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतानाच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान देणारे राजापूर तालुक्यातील ओझर येथील प्राथमिक शिक्षक दत्तात्रय शहाजी गायकवाड यांनी राष्ट्रीय कबड्डी पंच (All India Referee) परीक्षा उत्तीर्ण करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
मूळचे कोल्हापूर येथील असलेले दत्तात्रय गायकवाड गेली २१ वर्षे राजापूर तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. चिखलगाव आणि कोळवणखडी येथे सेवा बजावल्यानंतर सध्या ते ओझर येथील शाळेत अध्यापन करत आहेत. आपल्या अध्यापन कारकिर्दीत त्यांनी शिष्यवृत्ती व नवोदयसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले आहेत.
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी, खो-खो आणि रग्बी या खेळांतील अनेक विद्यार्थी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर चमकले आहेत.
विद्यार्थ्यांना क्रीडेचे धडे देताना स्वतःही त्यांनी कबड्डी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. ते राज्यस्तरीय अधिकृत कबड्डी पंच असून गेली १६ ते १७ वर्षे तालुका व जिल्हा कबड्डी असोसिएशनमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यांच्या माध्यमातून राजापूर तालुक्यातील किशोर, कुमार आणि खुल्या गटातील अनेक खेळाडूंना तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये संधी मिळाली आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यात कबड्डी स्पर्धा आणि गायकवाड सर हे समीकरणच बनले आहे.
यावर्षी मे महिन्यात मुंबईतील वडाळा येथे Amateur Kabaddi Federation of India (AKFI) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया कबड्डी रेफ्री परीक्षेत देशभरातील विविध राज्यांतील सुमारे १५० परीक्षार्थींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवत दत्तात्रय गायकवाड यांनी राष्ट्रीय कबड्डी पंच (All India Referee) हा मानाचा दर्जा प्राप्त केला.
शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतानाच क्रीडा क्षेत्रातही राष्ट्रीय स्तरावर यश मिळवणाऱ्या दत्तात्रय गायकवाड यांच्या या यशाबद्दल शिक्षण व क्रीडा क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

