(मुंबई / वृत्तसंस्था)
नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 25 जुलै रोजी दिलेल्या राजीनाम्यानंतर मुंबईत राजकीय वातावरण तापले आहे. या घडामोडीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नियोजित तिरंगा रॅलीऐवजी “अभिनंदन सभा” घेण्याचा निर्णय घेतला. रविवारी (26 जुलै) दादर येथील शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेला मोठ्या संख्येने तरुणांनी उपस्थिती लावत हातात तिरंगा घेऊन जल्लोष साजरा केला. यावेळी दोन्ही नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज कोणतीही निवडणूक आपण जिंकलेलो नाही. मात्र अंधभक्तांविरुद्धच्या लढाईत देशभक्तांचा विजय झाला आहे.” जात, धर्म आणि पंथ यापलीकडे जाऊन देशभक्त म्हणून तरुणाई एकत्र आल्याबद्दल त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
केंद्र सरकारवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “एका झुरळाने हुकूमशाहीला नमवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता तरी राजकारणातून वेळ काढून देशाच्या खऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. तसेच पक्ष फोडण्यात व्यस्त असलेल्या आपल्या मंत्र्यांना जनतेसाठी काम करण्यास सांगावे.”
यावेळी त्यांनी केंद्रातील काही मंत्र्यांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उल्लेख करत त्यांनी महागाई, रुपयाची घसरण, देशाची सुरक्षा आणि पेपरफुटी प्रकरणावरून सरकारवर टीका केली.
नीट पेपरफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, “मोदीजी, तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेताना वेदना झाल्या असतील. मात्र या व्यवस्थेमुळे ज्यांनी आपल्या मुलांना गमावले, त्या कुटुंबीयांच्या वेदना त्याहून कितीतरी मोठ्या आहेत.”
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी त्या विद्यार्थ्यांची नावे वाचून दाखवली आणि सभेतील उपस्थितांना दोन मिनिटे मौन पाळण्याचे आवाहन केले.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आयोजित या अभिनंदन सभेला मोठ्या प्रमाणावर तरुणांची उपस्थिती लाभली. त्यामुळे ही सभा केवळ राजकीय कार्यक्रम न राहता, नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेले महत्त्वाचे शक्तिप्रदर्शन ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

