(रत्नागिरी)
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे “सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील पकडलेल्या सागरी माशांच्या जैवविविधतेचे मूल्यांकन व दस्तावेजीकरण” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन १० सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले. या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे म्हणून संत राउळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथील संशोधन प्रकल्प प्रमुख डॉ. एन. पी. कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्राचार्य डॉ. केतनकुमार चौधरी यांनी प्रमुख सादरकर्त्यांची ओळख करून दिली. त्यानंतर डॉ. कांबळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी मत्स्य जैवविविधतेबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर प्राध्यापक श्री. सुशील कांबळे यांनी “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी मत्स्य उत्पादनाचे संख्यात्मक विश्लेषण”, श्रीमती स्नेहल सावंत यांनी “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी मासळीचे वर्गीकरण” तर श्री. कदम (संशोधन सहयोगी) यांनी “वर्गीकरणातील समस्या” या विषयांवर सादरीकरण केले.
या कार्यशाळेचा उद्देश सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सागरी माशांच्या जैवविविधतेचे शास्त्रीय मूल्यांकन, दस्तावेजीकरण आणि संशोधन निष्कर्षांवर शैक्षणिक चर्चा घडवून आणणे हा होता. या चर्चेमुळे मिळालेला शैक्षणिक अभिप्राय संशोधन अधिक परिणामकारक ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
ही कार्यशाळा मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव; सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव; संत राउळ महाराज महाविद्यालय, कुडाळ तसेच मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. चौधरी यांनी डॉ. कांबळे तसेच सहयोगी सादरकर्ते श्रीमती स्नेहल सावंत आणि श्री. कदम यांचे आभार मानले. या चर्चासत्राला मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र व मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी येथील प्राध्यापक, संशोधक तसेच तृतीय वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेतून मिळालेल्या निष्कर्षांचे सादरीकरण पुढे महाराष्ट्र जनुक प्रकल्पाकडे करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे आयोजन कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी आणि कृषी तंत्र शिक्षण विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संतोष वरवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

