(नाणीज / वार्ताहर)
पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून मिऱ्या-नागपूर महामार्गावरील पाली ते देवळे फाटा या मार्गाच्या दुतर्फा परिसरात रविवारी, दि. २६ जुलै रोजी भव्य सामूहिक वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात एकाच वेळी हजारो वृक्षांची लागवड केली जाणार असून, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हा उपक्रम विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
या कार्यक्रमास जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची प्रेरणादायी उपस्थिती लाभणार असून, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३.३० वाजता सर्व सहभागी एकाच वेळी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा सामूहिक संकल्प साकारतील.
या उपक्रमात जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थानाचे हजारो अनुयायी सहभागी होणार आहेत. पूर्वनियोजित ठिकाणी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये सर्वजण एकाच वेळी वृक्षारोपण करणार असून, पर्यावरण रक्षणासाठी सामूहिक लोकसहभागाचे प्रभावी उदाहरण या माध्यमातून निर्माण होणार आहे.
रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू होते. या कामादरम्यान महामार्गालगतची अनेक झाडे तोडण्यात आली. परिणामी, प्रवाशांना मिळणारी नैसर्गिक सावली कमी झाली आणि परिसरातील हिरवाईही मोठ्या प्रमाणात घटली. आता महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असताना पुन्हा परिसर हिरवागार व्हावा, पर्यावरणाचा समतोल राखला जावा आणि भावी पिढ्यांसाठी समृद्ध हरित वारसा निर्माण व्हावा, या उद्देशाने जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थानाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
यासाठी खास तामिळनाडूतून सुमारे १० ते १२ फूट उंचीची विकसित रोपे आणण्यात आली आहेत. उंच वाढ झालेली ही रोपे लावल्यामुळे त्यांचे संवर्धन अधिक सुलभ होणार असून, अल्पावधीतच महामार्गालगतचा परिसर पुन्हा हिरवागार होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रवाशांना भविष्यात नैसर्गिक सावलीचा लाभ मिळावा, हाही या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या अभियानांतर्गत आंबा, जांभूळ, वड, पिंपळ आणि कदंब यांसारख्या पर्यावरणपूरक व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. जैवविविधता वाढविणे, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि हरित पट्टा विकसित करणे या दृष्टीने या वृक्षांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून ५ जुलै ते १९ जुलै या कालावधीत देशभरात तब्बल ६ लाख १८ हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्याच व्यापक पर्यावरण अभियानाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेला हा सामूहिक वृक्षारोपण उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यासाठीही प्रेरणादायी ठरणार असून, पर्यावरण संरक्षणाच्या चळवळीला नवी दिशा देणारा उपक्रम म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

