(जाकादेवी / संतोष पवार)
मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयाला संलग्न असलेल्या बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील जेष्ठ शिक्षक शिवानंद विश्वनाथ गुरव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने यांचे रविवार दि.२२ रोजी रात्री १० वाजण्याच्या दरम्याने वयाच्या ५६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. रविवार दि.२२ रोजी जाकादेवी खालगाव येथील बँक ऑफ इंडिया शाखा जाकादेवी समोरील मुख्य रस्त्यावरुन रात्री चालत जात असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते जागीच पडले होते. शिवानंद गुरव हे जाकादेवी येथील ग्रामस्थांना रस्त्याच्या बाजूला पडल्याचे निदर्शनास आले असता त्यांना ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी शिवानंद गुरव यांना मृत घोषित केले.
शिक्षक शिवानंद गुरव हे बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात सुमारे २० वर्ष मराठी व हिंदी विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत होते. ते कडक शिस्तीचे व मनमिळावू स्वभावाचे होते. स्पर्धा उपक्रमात ते विद्यार्थ्यांना अतिशय सक्रियपणे मार्गदर्शन करत असत. जाकादेवी येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत त्यांनी उत्तम अध्यापनाचे काम केले. ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील वडरगे गावचे होय.त्यांच्या पश्चात आई, बहीण ,पुतणे,भाचे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने मालगुंड एज्युकेशन सोसायटीसह शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमधून, आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ व पालकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. कै. शिवानंद गुरव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी दि.२३ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. गुरव यांना मालगुंड एज्युकेशन सोसायटी व शिक्षण संस्थेच्या अनेक विद्यालयांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.