( राजापूर / वार्ताहर )
इन्स्टाग्रामवरील ओळखीतून मैत्री झाल्यानंतर अल्पवयीन युवतीला राजापूर शहरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा तसेच या प्रकाराचे व्हिडिओ शूट करून ते अन्यत्र व्हायरल करत तिची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी एका अल्पवयीन युवकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती राजापूर पोलिसांनी दिली.
पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान कोदवली साईनगर येथील एका लॉजवर हा प्रकार घडला. शिक्षणासाठी राजापूर शहरात येणाऱ्या या अल्पवयीन युवतीची राजापुरातच शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन युवकासोबत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले.
या मैत्रीचा गैरफायदा घेत संबंधित युवकाने युवतीला फूस लावून १९ ऑगस्ट रोजी कोदवली साईनगर येथील एका लॉजवर नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. यावेळी संबंधित युवकाने या प्रकाराचे व्हिडिओ शूटिंग केले. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ आपल्या एका मित्राला ‘वन टाईम व्ह्यू’ मोडमध्ये फॉरवर्ड केला. त्या मित्राने दुसऱ्या मोबाईलद्वारे त्याचे स्क्रीनिंग करून तो व्हिडिओ अन्य एका मित्राला पाठविला.
या प्रकाराची माहिती पीडित युवतीच्या चुलत भावाला मिळाल्यानंतर त्याने तिच्याकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी युवतीने घडलेला प्रकार सांगितला. आपल्याला लॉजवर नेऊन अत्याचार केल्यानंतर संबंधित युवकाने त्याचे व्हिडिओ शूटिंग केल्याची माहिती तिने दिली. त्यानंतर युवतीने राजापूर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, आपल्या फिर्यादीत तिने घटनेची सविस्तर माहिती दिली आहे.
या तक्रारीच्या आधारे राजापूर पोलिसांनी अल्पवयीन युवकाविरोधात भारतीय न्याय संहिता ६४।१, पोक्सो अंतर्गत ४।८।१२।१४ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७ बी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करणाऱ्या व्यक्तींचाही शोध सुरू आहे. त्यांनाही ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी लॉज मालकाविरोधातही गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव अधिक तपास करत आहेत. या प्रकारामुळे राजापूर शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.


