(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालय हे वाचन संस्कृतीसोबतच पर्यावरण संवर्धनाचेही प्रभावी केंद्र बनले आहे. ग्रंथालयाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत तब्बल ९०० झाडांची लागवड करून त्यांचे यशस्वी संवर्धन करण्यात आले असून, याच उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणून आज (गुरुवारी, दि. १६) रोजी ग्रंथालयाच्या आवारात २०० नारळ रोपांचे विद्यार्थी, ग्रामस्थ आणि वृक्षप्रेमींना मोफत वितरण करण्यात आले. यावेळी ग्रंथालय परिसरात लावलेल्या कदंब वृक्षाचा तिसरा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्लोबल वॉर्मिंग, वाढते तापमान आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता गावपातळीवर वृक्षसंवर्धनाची चळवळ उभारण्याचा संकल्प श्री रत्नेश्वर ग्रंथालयाने केला आहे. केवळ झाडे वाटण्यापुरता हा उपक्रम मर्यादित नसून, त्या झाडांचे संगोपन, नियमित पाहणी आणि वृक्षप्रेमींना मार्गदर्शन करून त्यांचे संवर्धन करण्यावर विशेष भर दिला जात असल्याची माहिती ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांनी दिली.
यावेळी ग्रंथालयाचा “एक झाड – एक पुस्तक” हा अभिनव उपक्रमही उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनासोबतच वाचन संस्कृतीही जोपासली जावी, या उद्देशाने प्रत्येक झाडासोबत विद्यार्थ्यांना एक दर्जेदार वाचनीय पुस्तक भेट देण्यात आले. मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे वाचनाची आवड कमी होत असताना हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणारा ठरत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
उमेश कुळकर्णी म्हणाले की, “आम्ही फक्त झाडे वाटत नाही, तर ती जगविण्याची जबाबदारीही स्वीकारतो. प्रत्येक झाडाची नियमित माहिती, छायाचित्रे आणि त्याच्या वाढीचा आढावा घेतला जातो. ज्या व्यक्तींनी झाडांचे उत्तम संगोपन केले आहे, त्यांना ‘वृक्षमित्र’ म्हणून सन्मानित करण्यात येते. त्यामुळे झाडांविषयी आपलेपणाची भावना निर्माण होते.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘एक झाड आईच्या नावे’ या संकल्पनेलाही ग्रंथालयाने आपल्या उपक्रमाशी जोडले आहे. त्यानुसार अनेक झाडांना घरातील दिवंगत व्यक्तींची नावे देण्यात येत असून, त्यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच उपक्रमांतर्गत यावेळी दिवंगत डॉ. एन. पी. सांबरे यांच्या स्मरणार्थ ग्रंथालयाच्या आवारात नारळाचे रोप उमेश कुळकर्णी यांच्या हस्ते लावण्यात आले.
यावेळी गेल्या वर्षी ग्रंथालयाकडून झाडे घेऊन त्यांचे उत्कृष्ट संगोपन करणाऱ्या ४० वृक्षमित्रांचा प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संवर्धन करणाऱ्यांचा गौरव करण्याची परंपरा ग्रंथालयाने कायम ठेवली आहे.
कार्यक्रमात विद्यार्थी, ग्रामस्थ आणि उपस्थितांनी “एक झाड लावूया, पर्यावरण वाचवूया… एक पुस्तक वाचूया, ज्ञानदीप लावूया…” हा संदेश देत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. यंदा वितरित करण्यात आलेल्या नारळाच्या रोपांची योग्य निगा राखण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही लाभार्थ्यांना देण्यात आले. भविष्यात खतपाणी, देखभाल आणि तांत्रिक सल्लाही ग्रंथालयामार्फत उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उमेश कुळकर्णी यांनी दिली.
विशेष म्हणजे, हा उपक्रम ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. वाढदिवस साजरा करण्याऐवजी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आणि रोपवाटपाचा उपक्रम राबविण्याच्या त्यांच्या संकल्पनेचे उपस्थितांनी कौतुक केले.
या कार्यक्रमास धामणसेचे सरपंच अमर रहाटे, उपसरपंच सौ. ऋतुजा कुळकर्णी, रत्नागिरी नगरपालिकेच्या नगरसेविका सौ. मेधा कुळकर्णी, श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत देसाई, उपाध्यक्ष अविनाश जोशी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विजय निवेंडकर, सोसायटीचे सचिव सुनील लोगडे, दीपक जाधव, ग्रंथालयाचे चिटणीस मुकुंद जोशी, उपाध्यक्ष विलास पांचाळ, ग्रंथपाल केशव कुळकर्णी, संचालक प्रशांत रहाटे, विश्वास धनावडे, अनंत जाधव, सौ. स्मिता कुळकर्णी, अविनाश लोगडे, अन्वी वारशे, ग्रामपंचायत सदस्या सौ. वैष्णवी धनावडे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय गायकवाड, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ढापरे, अंगणवाडी सेविका, ओरी गावातील ग्रामस्थ शंतनू देसाई, राजेंद्र डाफळे, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री रत्नेश्वर ग्रंथालयाने गेल्या तीन वर्षांत ९०० झाडांचे संवर्धन करून पर्यावरण संरक्षणाची प्रभावी चळवळ उभी केली आहे. त्याचबरोबर वाचन संस्कृती आणि वृक्षसंवर्धन यांची सांगड घालणारा “एक झाड – एक पुस्तक” हा उपक्रम जिल्ह्यात आदर्श ठरत असून, पर्यावरणपूरक आणि ज्ञानसमृद्ध समाज घडविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

