(मुंबई / वृत्तसंस्था)
भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेने भाजपला धक्का दिला आहे. भाजप युवक मोर्चाचे उत्तर-पश्चिम मुंबई उपनगरचे उपाध्यक्ष आणि मंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय दाऊद शेख यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मनसेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत भाजप युवा मोर्चातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मनसेचा झेंडा हाती घेतला. मनसे नेते आणि विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. त्यामुळे मुंबईतील भाजपच्या युवा संघटनेला खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दाऊद शेख हे भाजप युवक मोर्चामध्ये उत्तर-पश्चिम मुंबई उपनगरचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे. मात्र, त्यांनी आता भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वासह पक्षातील पदाचा राजीनामा देत मनसेत प्रवेश केला आहे. शेख यांच्यासोबत भाजप युवा मोर्चातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मनसेमध्ये प्रवेश केला. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी मनसेची वाट धरली.
भाजप आणि मनसेमध्ये फोटो हटवण्याच्या मुद्द्यावरून संघर्ष वाढल्यानंतर हा पक्षप्रवेश झाला आहे. पुण्यातील एका शासकीय महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी लावण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो अमित ठाकरे यांच्या सांगण्यानंतर हटवण्यात आला होता. त्यानंतर भाजप आणि मनसे आमनेसामने आले. भाजप युवा मोर्चाने या घटनेचा निषेध करत मोर्चा काढला होता. या घटनेचा व्हिडिओ आणि माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.
पुण्यातील या घटनेचे पडसाद मुंबईतही उमटले. माहीम परिसरात भाजप युवा मोर्चा आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी झाली तसेच धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.
याच पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मनसेतील प्रवेश भाजपसाठी धक्का मानला जात आहे. विशेषतः मंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दाऊद शेख यांनीच भाजप सोडल्याने या पक्षप्रवेशाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
पक्षप्रवेशावेळी अमित ठाकरे यांनी भाजप युवा मोर्चातून काही पदाधिकारी मनसेत आल्याचा उल्लेख केला. जिथे काम करता येते, तिथे युवकांना येण्याची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले. “आमच्याकडून जाणारे पैसे घेऊन जातात आणि आमच्याकडे येणारे विचार घेऊन येतात,” असेही अमित ठाकरे म्हणाले. सत्ता नसतानाही संघर्ष करून आम्ही प्रश्न सोडवत असल्याचे त्यांनी सांगितले.
एमपीएससी पेपरफुटीच्या मुद्द्यावरूनही अमित ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. “पेपर फुटतात कसे? प्रायव्हेट क्लासला जातात कसे? NEET फुटल्यावर काय होणार?” असा सवाल करताना “तो पेपर फुटणार नाही ते कोण पाहणार.. नियुक्त्या नीट झाल्या पाहिजे हे कोण पाहणार?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. NEET पेपरफुटी कोणामुळे झाली हे माहीत असतानाही कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी केला. त्याचप्रमाणे MPSC पेपरफुटीबाबतही कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करत “एक उदाहरण घालून द्या,” अशी मागणी त्यांनी केली.
लवकरच महाराष्ट्र दौरा करून तरुण-तरुणींचे प्रश्न सोडवणार असल्याचेही अमित ठाकरे यांनी सांगितले. महत्त्वाच्या मुद्द्यांवरून आपण आता मागे हटणार नसल्याचे स्पष्ट करत विद्यार्थी आणि इतरांचे प्रश्न यापुढेही उचलत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. “आमच्या अंगावर आलात तर आम्ही अंगावर येणार,” असा इशारा देतानाच “छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो दिसला की तो काढत राहणार,” असेही त्यांनी सांगितले.


