(मुंबई / वृत्तसंस्था)
बृहन्मुंबई गुजराती समाज आणि महाराष्ट्रातील गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच नंतरच्या काळात उद्धवसेनेचे संघटक म्हणून कार्यरत असलेले रेखा प्रकाशनाचे प्रमुख डॉ. हेमराज शाह यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८४ वर्षे होते. त्यांच्या पश्चात अरविंद शाह आणि उदय शाह ही दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गुजराती समाजासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. हेमराज शाह यांचा जन्म २२ मार्च १९४१ रोजी कच्छमध्ये झाला. गेल्या ८० वर्षांपासून ते मुंबईत वास्तव्यास होते. सर जे. जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्टमध्ये त्यांनी एफ. वाय. पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर ब्रॅम्प्टन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, कॅनडा येथून मानवता आणि सामाजिक कार्यासाठी त्यांना मानद पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी फिल्म सेन्सॉर बोर्ड, मुंबई दुरुस्ती व पुनर्बांधणी मंडळ आणि विक्रीकर सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम केले. शिर्डीच्या साईबाबा संस्थानाचे विश्वस्त तसेच महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली.
महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाच्या स्थापनेपासून तब्बल ३५ वर्षे त्यांनी अध्यक्षपद भूषवले. बृहन्मुंबई गुजराती समाजाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. विश्व गुजराती समाज, द बुक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कच्छ-शक्ती, उमरगाव गोशाळा आणि श्री वागड वीसा ओसवाल विकास समाज यांसह विविध संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
लेखन आणि संपादन क्षेत्रातही डॉ. हेमराज शाह यांनी स्वतंत्र ठसा उमटवला. स्तंभलेखक आणि संपादक म्हणून त्यांनी काम केले असून विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला होता. त्यांनी गुजराती भाषेत १९, मराठीत ८ आणि इंग्रजीत २ पुस्तके अनुवादित केली. याशिवाय गुजरातीतील ३२ आणि मराठीतील ४ पुस्तके त्यांनी संपादित केली.
बृहन्मुंबई गुजराती समाजाच्या माध्यमातून त्यांनी १३९ गुजराती संस्थांचे फेडरेशन उभारले. या संस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सातत्याने कार्यरत राहिले. त्यांच्या पुढाकारातून जोगेश्वरी (पश्चिम) येथे ७ मजली नवनीत गुजराती समाज भवनाची उभारणी करण्यात आली.
महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय प्रवर्गात १० विविध जातींचा समावेश करण्यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. जोगेश्वरी येथील नवनीत गुजराती समाज भवनात त्यांच्या कार्याची आठवण जपण्यासाठी डॉ. हेमराज शाह यांची स्मृती गॅलरी/संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे.
डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनप्रवासावर ‘हेमराज शाह : एक समर्पित जीवन’ ही डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली. या डॉक्युमेंटरीला दिल्लीतील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट स्क्रीनप्लेचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या जीवनावर कादंबरी आणि नाटकाचीही निर्मिती करण्यात आली आहे.


