(मुंबई / प्रतिनिधी)
भारतातील डिजिटल व्यवहारांना नवी दिशा देणाऱ्या ‘यूपीआय’चा विस्तार आता देशाच्या सीमांपलीकडे भारताशी व्यापार करणाऱ्या देशांमध्ये करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न राहणार आहे. भारत आणि सिंगापूरदरम्यान यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करणे जसे दोन भारतीय शहरांमध्ये व्यवहार करण्याइतके सोपे झाले आहे, त्याच धर्तीवर भारताशी व्यावसायिक संबंध असलेल्या अन्य देशांमध्येही यूपीआयचे जाळे वाढविण्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुंबईत मांडली.
बीकेसी येथील ‘जिओ वर्ल्ड’ सेंटरमध्ये मंगळवारी (दि. ८) ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ २०२६ चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या जागतिक फिनटेक महोत्सवाची सातवी आवृत्ती ८ ते ११ सप्टेंबर या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. उद्घाटन कार्यक्रमाला जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी संबोधित करताना मोदी यांनी भारताच्या फिनटेक क्षेत्रातील परिवर्तनात यूपीआयचे महत्त्व अधोरेखित केले. यूपीआयचा उल्लेख केल्याशिवाय भारताची फिनटेक कहाणी अपूर्ण राहते, असे त्यांनी स्पष्ट केले.
२५ ऑगस्ट रोजी यूपीआयने दहा वर्षांचा टप्पा पूर्ण केला. दहा वर्षांपूर्वी ‘तुमची बँक तुमच्या हातात असेल’ असे सांगितले असता अनेकांना ही बाब अशक्य वाटत होती, अशी आठवण मोदी यांनी सांगितली. यूपीआयच्या माध्यमातून आर्थिक सेवा अधिक सुलभ झाल्या असून त्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
देशांतर्गत डिजिटल व्यवहारांपुरता यूपीआयचा वापर मर्यादित न ठेवता भारताशी व्यापार करणाऱ्या देशांपर्यंत त्याचा विस्तार करण्याची गरज मोदी यांनी व्यक्त केली. भारत-सिंगापूर यूपीआय जोडणीचा संदर्भ देताना दोन्ही देशांतील व्यवहार दोन भारतीय शहरांमधील व्यवहाराइतके सुलभ झाल्याचे त्यांनी सांगितले. यूपीआयला ‘सभ्यताविषयक कथा’ असे संबोधत त्याच्या जागतिक विस्ताराचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
जगभरात संघर्ष आणि अनिश्चिततेचे वातावरण असून ऊर्जा आणि वस्तूंच्या पुरवठा साखळीवर दबाव कायम आहे. व्यापारातील तणावाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल-जून ही तिमाही सर्वात आव्हानात्मक होती, असे मोदी यांनी सांगितले. या परिस्थितीतही भारताने एप्रिल-जून तिमाहीत ७.८ टक्के आर्थिक वाढ नोंदविल्याचे त्यांनी नमूद केले. भारताच्या या विकासदरामुळे जगभरात नवा आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.
भारताविषयी वाढत असलेल्या जागतिक आत्मविश्वासाचे आणखी एक उदाहरण म्हणून मोदी यांनी सार्वभौम पतमानांकनातील सुधारणा सांगितली. एका जपानी क्रेडिट रेटिंग एजन्सीने अलीकडे भारताचे सार्वभौम पतमानांकन ‘ए’ श्रेणीत सुधारले आहे. तब्बल तीन दशकांनंतर झालेली ही सुधारणा असून भारताच्या आर्थिक वाढीचा वेग, व्यापक आर्थिक स्थैर्य आणि गेल्या काही वर्षांतील संरचनात्मक सुधारणांवरील जागतिक विश्वासाचे ते द्योतक असल्याचा दावा मोदी यांनी केला. रेटिंगमधील ही सुधारणा समाधानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’मध्ये सलग तिसऱ्यांदा सहभागी होत असल्याचा उल्लेख करत मोदी यांनी या सहभागाला ‘हॅट्ट्रिक’शी जोडले. २०२४ मध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यामुळे एक हॅट्ट्रिक झाली आणि ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’मधील त्यांच्या सलग तिसऱ्या वर्षाच्या उपस्थितीशी दुसरी हॅट्ट्रिक संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. ‘विकसित भारता’साठी फिनटेक क्षेत्रातील प्रतिनिधींचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करताना प्रत्येक वेळी या कार्यक्रमाला आल्यानंतर अधिक तरुणांचा सहभाग, अधिक ऊर्जा आणि विस्तारत जाणाऱ्या नव्या शक्यता जाणवत असल्याचे मोदी म्हणाले.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अवघ्या काही दिवसांत गणेशोत्सवाला सुरुवात होणार असल्याचा उल्लेखही मोदी यांनी केला. “फिनटेक क्षेत्रातील या उत्साहाच्या वातावरणासोबतच सध्या मुंबईची सांस्कृतिक ऊर्जाही शिगेला पोहोचली आहे. अवघ्या काही दिवसांतच महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. याठिकाणी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी भगवान गणेशाचे आवाहन केले जाते. मी गणपती बाप्पाला नमन करतो आणि ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ 2026 साठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो,” असे मोदी यांनी सांगितले.
यंदाच्या फिनटेक फेस्टची संकल्पना ‘पोटेन्शियल टू इम्पॅक्ट : एजंटिक एआय, टोकनायझेशन, क्वांटम-ट्रस्टेड, कनेक्टेड, ग्लोबल सिस्टिम्स फॉर इन्क्लुझिव्ह फायनान्स’ अशी आहे. देश-विदेशातून आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि प्रतिनिधींचे स्वागत करताना मोदी यांनी ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’मधील वाढता तरुण सहभाग आणि नव्या संधींचा विस्तार याकडे लक्ष वेधले.


