(रत्नागिरी / प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील दहिवली गावातील शेलारवाडी येथे जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण भूस्खलन दुर्घटनेनंतर जीवाची पर्वा न करता तब्बल २१ तास शोध व बचाव मोहिमेत सहभागी झालेल्या खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विवेक आहिरे, पोलीस अधिकारी-अंमलदार तसेच दहिवलीतील धाडसी युवकांच्या कार्याचा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने गौरव केला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित मासिक गुन्हे आढावा बैठकीदरम्यान या सर्वांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. आपत्तीच्या कठीण काळात दाखविलेल्या धैर्य, तत्परता आणि निःस्वार्थ सेवाभावाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आल्याची माहिती पोलीस दलाकडून देण्यात आली. ६ जुलै २०२६ रोजी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील दहिवली गावातील शेलारवाडी येथे अचानक भीषण भूस्खलन झाले होते. या दुर्घटनेत अनेक घरे मातीच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली गाडली गेली. काही नागरिक बेपत्ता झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त झाली होती. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्हा पोलीस दल, जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) तसेच विविध यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि युद्धपातळीवर शोध व बचाव कार्य सुरू करण्यात आले होते.
या मोहिमेदरम्यान सततचा मुसळधार पाऊस, खोल चिखल आणि दरड कोसळण्याचा धोका अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विवेक आहिरे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस अधिकारी, अंमलदार आणि दहिवली गावातील युवकांनी सलग २१ तास अथक परिश्रम घेत बचावकार्य सुरू ठेवले. जीव धोक्यात घालून केलेल्या त्यांच्या योगदानामुळे शोध व बचाव मोहिमेला मोठे बळ मिळाले आणि प्रशासनाच्या प्रयत्नांना प्रभावी साथ लाभली. आपत्तीच्या काळात प्रशासनाला मिळालेल्या स्थानिक युवकांच्या सहकार्याचे विशेष कौतुक करत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचा गौरव केला. २४ जुलै २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या समारंभात पोलीस निरीक्षक विवेक आहिरे आणि दहिवली गावातील युवकांना प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांच्या धाडसाला आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीला सलाम करण्यात आला आहे.

