(देवळे / प्रकाश चाळके)
लांजा-राजापूर मतदारसंघातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी, समस्या आणि प्रलंबित मागण्यांबाबत आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि संबंधित संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करत त्यावर प्रभावी उपाययोजनांबाबत विचारमंथन करण्यात आले.
बैठकीत आंबा व काजू पिकांवरील रोग व कीड नियंत्रण, वाढता उत्पादन खर्च, बाजारपेठेतील चढ-उतार, उत्पादनाला योग्य दर, पीक विमा, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, सिंचन सुविधा, फळबागांचे संरक्षण, निर्यात प्रक्रियेतील अडचणी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी कोकणातील आंबा आणि काजू ही येथील अर्थव्यवस्थेची प्रमुख पिके असल्याचे अधोरेखित केले. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासनाकडे ठोस पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे आणि आवश्यक प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
शेतकरी प्रतिनिधींनी बैठकीत पीक विमा, नुकसानभरपाई, सुलभ कर्जसुविधा, फळ प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन, शीतगृह व साठवणूक सुविधा, तसेच आंबा व काजू उत्पादनासाठी आधुनिक तांत्रिक मार्गदर्शन आणि देशांतर्गत व निर्यात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
बैठकीदरम्यान संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नियमानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून प्रलंबित मागण्यांबाबत शासन स्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमुळे लांजा-राजापूर मतदारसंघातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केली.
बैठकीस जिल्हाधिकारी मनोज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, कृषी अधीक्षक सदाफुले, लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, राजापूर तहसीलदार विकास गबरे, रत्नागिरी तहसीलदार राजाराम म्हात्रे, एलडीएम श्री. कांनसे, कृषी विद्यापीठाचे अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

