(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कत्तलीच्या उद्देशाने दोन बैलांची परवान्याविना आणि निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी देवरूख पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साडवली पार येथे सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन बैलांसह बोलेरो पिकअप असा एकूण सुमारे ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर रोजी पहाटे साडवली पार येथे बोलेरो पिकअप (एमएच-१०-झेड-८८६७) मधून दोन बैलांची वाहतूक होत असल्याचे आढळले. वाहनातील बैलांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना संबंधितांकडे नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्याचबरोबर बैलांना आखूड दोरीने करकचून बांधण्यात आले होते. त्यांच्या हालचालींना पुरेसा वाव न देता वाहनाच्या हौद्यात दाटीवाटीने त्यांना ठेवण्यात आल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. ही वाहतूक कत्तलीच्या उद्देशाने कासारवाडी ते मलकापूर अशी केली जात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणी श्रीधन तानाजी बाळेकुंद्री (३०, रा. साडवली साईनगर, ता. संगमेश्वर) यांच्या फिर्यादीवरून देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४५/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
माणिक शंकर कदम, वसंत चंद्राप्पा कांबळे, विक्रम राजाराम पवार, उदय मांगले आणि राजेंद्र रविकांत मोहिरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे १५ हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा, अंदाजे आठ वर्षे वयाचा गावठी जातीचा बैल आणि सुमारे १५ हजार रुपये किमतीचा तांबड्या रंगाचा, अंदाजे सात वर्षे वयाचा जर्सी जातीचा बैल यांचा समावेश आहे. याशिवाय सुमारे तीन लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३ लाख ३० हजार रुपये आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र प्राणीसंरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५ (अ), ५ (ब), ९, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११ (१) (घ), (ड), महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ११९, मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ६६/१९२ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास देवरूख पोलिस करीत आहेत.


