(राजापूर / वार्ताहर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोदवली येथील महालक्ष्मी मंदिराजवळील धोकादायक वळणावर गुरुवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास मिठाने भरलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. समोरून कोणतेही वाहन येत नसल्याने संभाव्य भीषण दुर्घटना थोडक्यात टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, (GJ-12-BV-6644) क्रमांकाचा ट्रक मुंबईहून गोव्याच्या दिशेने मिठाची पोती घेऊन जात होता. महालक्ष्मी मंदिराजवळील तीव्र व धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक प्रथम दुभाजकावर चढला आणि त्यानंतर विरुद्ध दिशेच्या मार्गावर पलटी झाला.
अपघातामुळे ट्रकमधील मिठाची पोती महामार्गावर विखुरली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बॅरिकेड्स उभारून वाहतूक सुरळीत केली. तसेच अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, आज (शुक्रवारी) पलटी झालेला ट्रक हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. कोदवली येथील महालक्ष्मी मंदिराजवळील हे वळण अपघातप्रवण म्हणून ओळखले जाते. यापूर्वीही येथे अनेक अपघात घडले असून कायमस्वरूपी सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

