(रत्नागिरी /प्रतिनिधी)
विश्वासाच्या नात्याला तडा देणारी घटना रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील कुंभारवाडी सडा परिसरात उघडकीस आली आहे. घरकामासाठी येणाऱ्या आणि कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक मिळालेल्या महिलेविरुद्ध तब्बल ८० हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या चोरी केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गोळप येथील कुंभारवाडी सडा परिसरातील रहिवासी मंगेश शंकर साळवी (वय ६०, व्यवसाय-व्यापार) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत त्यांच्या घरातील बेडरूममध्ये ठेवलेल्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरीस गेल्याचे समोर आले. या प्रकरणी २३ जुलै रोजी रात्री ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरकाम करणारी सविता नरेंद्र गावडे (रा. कुंभारवाडी सडा, ता. रत्नागिरी) हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये १० ग्रॅम वजनाची नवग्रहाची सोन्याची अंगठी तसेच १० ग्रॅम वजनाची चौकोनी डिझाइनची सोन्याची अंगठी यांचा समावेश असून, त्यांची एकूण किंमत सुमारे ८० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे, संशयित महिला अनेक वर्षांपासून फिर्यादी यांच्या घरी घरकाम करत होती. फिर्यादी तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे मानत होते. ती आपली चूक मान्य करून अंगठ्या परत करेल, असा विश्वास असल्याने त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली नव्हती. मात्र, अपेक्षेप्रमाणे दागिने परत न मिळाल्याने अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या घटनेमुळे विश्वासाच्या नात्यातील फसवणुकीची चर्चा परिसरात रंगली असून, ग्रामीण पोलिस पुढील तपास करीत आहेत.

