(जैतापूर / वार्ताहर)
अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुरू असलेल्या गैरसमतोलामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची गंभीर बाब विधान परिषदेचे आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
डावखरे यांनी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी, प्रशासनिक तुटी आणि चुकीच्या यादीमुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता, संभ्रम आणि मानसिक तणाव वाढत असल्याचे नमूद केले आहे.
त्यांच्या पत्रात त्यांनी स्पष्ट केले की –
1. ओपन कॅटेगरीतील ९०% व त्याहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित आहेत.
2. तिसऱ्या व चौथ्या फेरीत गोगटे कॉलेजसारख्या नामांकित महाविद्यालयात जागा असूनही ओपन कॅटेगरीतील एकाही विद्यार्थ्याचे नाव यादीत आलेले नाही.
3. सायन्स शाखेत तिसऱ्या फेरीअखेर १८९ जागा रिक्त असूनही चौथ्या फेरीत फक्त ३ विद्यार्थ्यांची नावे जाहीर झाली.
4. कॉमर्स शाखेतही जागा असतानाही प्रवेश यादी योग्य पद्धतीने तयार न होणे.
याशिवाय, पाचव्या ‘ओपन टू ऑल’ फेरीमध्ये कमी टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांची नावे यादीत आली, मात्र उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थी तांत्रिक त्रुटींमुळे अजूनही बाहेर आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीती व संभ्रम कायम असून, शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.
या संदर्भात रत्नागिरीचे सामाजिक कार्यकर्ते राजू भाटलेकर यांनी ही बाब अॅड. डावखरे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. डावखरे यांनी शिक्षणमंत्र्यांना तातडीने या प्रकरणाची चौकशी करून तांत्रिक अडचणी दूर करण्याची, आवश्यक सुधारणा करण्याची आणि सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याची मागणी केली आहे.

