(संगमेश्वर / प्रतिनिधी)
परचुरी-वेल्येवाडी परिसरातील रेल्वे बोगद्यात रेल्वेची धडक लागून उत्तर प्रदेशातील ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. पातीराम काशीराम भिटोरा (वय ३०, रा. झाशी, लुहारी, उत्तर प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे.
ही घटना ८ सप्टेंबर रोजी रात्री एक वाजण्यापूर्वी परचुरी-वेल्येवाडी येथील रेल्वे बोगदा क्रमांक १८२ मध्ये घडली. रेल्वेची धडक बसल्याने भिटोरा गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. घटनेची माहिती परचुरी गावचे पोलिस पाटील सुधीर सिताराम गुरव यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी पहाटे ४.४४ वाजता संगमेश्वर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक पाहणीत भिटोरा यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. रेल्वेच्या धडकेमुळे त्यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या दुर्घटनेमागील नेमकी परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नसून, तरुण रेल्वे ट्रॅकवर कोणत्या कारणाने आला, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यू क्रमांक ३६/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी आणि मृत्यूमागील नेमकी परिस्थिती तपासातून स्पष्ट होणार असून, संगमेश्वर पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.


