(रत्नागिरी / प्रतिनिधी)
घराची साफसफाई करत असताना माळ्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या ७० वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना हरचेरी-कुंभारवाडी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सुभाष गणपत साळवी (वय ७०, रा. हरचेरी-कुंभारवाडी, ता. जि. रत्नागिरी) हे ५ सप्टेंबर रोजी घराची साफसफाई करीत होते. यावेळी तोल गेल्याने ते माळ्यावरून खाली पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी तातडीने त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात साळवी यांच्यावर उपचार सुरू होते.
मात्र, प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यान ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.५१ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती त्यांची मुलगी प्रिती मंदार आष्टेकर यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.


