( मुंबई )
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांची मनं जिंकलीच, पण रिअल इस्टेटमधील दूरदृष्टीमुळे त्यांनी शेकडो कोटींचे मालमत्ता साम्राज्यही उभे केले. गिरगावातील एका चाळीतील 10×20 च्या छोट्याशा खोलीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज 500 कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीपर्यंत पोहोचला आहे. अलीकडेच एका मुलाखतीत त्यांनी आपल्या आयुष्यातील पहिल्या मोठ्या प्रॉपर्टी डीलचा रंजक किस्सा सांगितला असून, तो सध्या सोशल मीडियावर आणि बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
जितेंद्र यांनी सांगितले की, 1950 च्या दशकातील ‘बैजू बावरा’ चित्रपटाचे प्रसिद्ध अभिनेते भारत भूषण आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर त्यांनी मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल परिसरातील बंगला केवळ 4.25 लाख रुपयांत विकत घेतला होता. आज त्याच जागेची किंमत सुमारे 450 ते 500 कोटी रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.
10×20 च्या चाळीतून पाली हिलपर्यंतचा प्रवास
आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण सांगताना जितेंद्र म्हणाले, “आम्ही गिरगावातील एका चाळीत 10×20 च्या छोट्या खोलीत आठ जण एकत्र राहत होतो. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी बंगला खरेदी करणे हे स्वप्नच होते.” ते पुढे म्हणाले की, भारत भूषण आर्थिक संकटात असताना त्यांनी स्वतः माझ्याकडे पाली हिलमधील त्यांचा बंगला विकण्याचा प्रस्ताव आणला. वडिलांशी चर्चा करून मी 3,450 चौरस फूट जागेसह तो बंगला 4.25 लाख रुपयांत खरेदी केला. त्या वेळी ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक होती.
सलग चार चित्रपट फ्लॉप, बंगला ‘अपशकुनी’ वाटू लागला
बंगला खरेदी केल्यानंतर जितेंद्र यांच्या आयुष्यात अनपेक्षित घटना घडल्या. नवीन घरात राहायला गेल्यानंतर त्यांचे सलग चार चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. या अपयशामुळे ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले. भारत भूषण यांच्यासारखीच आपलीही आर्थिक परिस्थिती बिघडेल, अशी भीती त्यांना वाटू लागली. त्यामुळे त्यांनी तो बंगला ‘अपशकुनी’ असल्याची भावना मनात ठेवून अखेर तो सोडण्याचा निर्णय घेतला.
बंगल्यातील लाकडानेच दिला तिप्पट नफा
काही वर्षांनी त्या बंगल्याच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव आला आणि जितेंद्र यांनी तो स्वीकारला. मात्र, बंगला पाडताना एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. बंगला खरेदीसाठी त्यांनी 4.25 लाख रुपये खर्च केले होते, पण बंगल्यातील सागवान लाकूड विकूनच तब्बल 11.5 लाख रुपये मिळाले. म्हणजेच पुनर्विकास सुरू होण्यापूर्वीच केवळ जुन्या बंगल्यातील लाकूड विकून त्यांनी मूळ गुंतवणुकीच्या जवळपास तिप्पट रक्कम वसूल केली.
‘गौतम अपार्टमेंट्स’ने बदलले नशीब
यानंतर त्या जागेवर ‘गौतम अपार्टमेंट्स’ ही इमारत उभारण्यात आली. जितेंद्र यांचा मुलगा आणि अभिनेता तुषार कपूर यांनी सांगितले की, आज या इमारतीतील फ्लॅटचा दर प्रति चौरस फूट सुमारे 85 हजार रुपये आहे. त्यामुळे संपूर्ण मालमत्तेची किंमत आता 450 ते 500 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.
‘जमीन तुमची निवड करते’
रिअल इस्टेटमधील यशाबद्दल बोलताना जितेंद्र यांनी एक वेगळीच भूमिका मांडली. ते म्हणाले, “रिअल इस्टेटमध्ये नशीब खूप महत्त्वाचे असते. जसे लोक म्हणतात की शिर्डीला साईबाबांचे बोलावणे आल्याशिवाय जाता येत नाही, तसेच जमिनीचेही असते. तुम्ही जमिनीची निवड करत नाही, तर जमीन तुमची निवड करते.”
एकेकाळी अपशकुनी वाटल्यामुळे सोडलेला तोच बंगला पुढे जाऊन जितेंद्र यांच्या रिअल इस्टेट साम्राज्याचा भक्कम पाया ठरला. चाळीतील छोट्याशा खोलीतून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज संघर्ष, दूरदृष्टी आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून पाहिला जात आहे.

