( ठाणे )
मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. ठाणे शहरात सोमवारी (9 मार्च) कमाल तापमान तब्बल 40 अंश सेल्सियसवर पोहोचले होते. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे नागरिकांसाठी त्रासदायक आणि जोखमीचे ठरत असून येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सध्या तापमान 38 ते 40 अंशांच्या दरम्यान
पहाटेच्या वेळी हवेत थोडासा गारवा जाणवत असला तरी सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागते. दुपारपर्यंत उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवत असल्याने शहरातील रस्त्यांवरील वर्दळही कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. सामान्यतः ठाण्यात कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सियस इतके असते. मात्र यंदा तापमानात 4 ते 5 अंशांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या शहरातील तापमान 38 ते 40 अंश सेल्सियस दरम्यान नोंदवले जात असल्याने नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माहितीनुसार शहरात किमान तापमान 26 अंश आणि कमाल तापमान 40 अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम
तज्ज्ञांच्या मते, वाढत्या उष्णतेमागे ग्लोबल वॉर्मिंग हे प्रमुख कारण आहे. पृथ्वीच्या तापमानात सातत्याने वाढ होत असल्यामुळे शहरांमध्येही उष्णतेची तीव्रता वाढत आहे. अत्याधिक उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, चक्कर येणे, अशक्तपणा, श्वसनाच्या तक्रारी वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच प्रखर सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो.
उन्हाळ्यात स्वतःची अशी घ्या काळजी
- दिवसातून जास्तीत जास्त पाणी प्या
- हलके आणि सूती कपडे वापरा
- दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळा
- बाहेर पडताना गॉगल्स, टोपी किंवा छत्रीचा वापर करा
- प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवा
- शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी यांसारख्या पेयांचे सेवन करा
मुक्या प्राण्यांवरही उष्णतेचा परिणाम
वाढत्या तापमानाचा परिणाम केवळ माणसांवरच नव्हे तर मुक्या प्राणी आणि पक्ष्यांवरही होत आहे. उष्माघातामुळे पक्षी आणि प्राणी बेशुद्ध होण्याच्या किंवा जखमी होण्याच्या घटना वाढत असल्याचे प्राणीमित्रांनी सांगितले. यामुळे अनेक सामाजिक संस्था उन्हाळ्यात विविध ठिकाणी पक्षी आणि प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत आहेत. नागरिकांनीही घराबाहेर पाण्याची भांडी ठेवून या मुक्या जीवांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.


