( कल्याण / ठाणे )
ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींमुळे नैराश्यात गेलेल्या भाऊ-बहिणीने कल्याण रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजमध्ये हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, वेळेत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले. या घटनेमुळे कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील बेलशेकर (वय 56) आणि त्यांची बहीण पद्मजा बेलशेकर (वय 53) अशी जखमी भाऊ-बहिणीची नावे आहेत. दोघेही मूळचे आसनगाव येथील रहिवासी असून, काही दिवसांपासून बेरोजगारी आणि कामधंदा नसल्यामुळे मानसिक तणावात होते. प्राथमिक तपासात नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही आसनगावहून कल्याणमध्ये आले आणि कल्याण रेल्वे स्थानकासमोरील एका लॉजमध्ये खोली घेतली. तेथेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. बहिणीने हाताची नस कापल्यानंतर दोघांची प्रकृती गंभीर झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने लॉजमध्ये धाव घेतली. दोघेही जखमी अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी तत्काळ त्यांना बाहेर काढून उपचारासाठी कलवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. सध्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेप्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून, आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत आर्थिक अडचणी, बेरोजगारी आणि त्यातून आलेले नैराश्य हे या टोकाच्या निर्णयामागील कारण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

