(मुंबई / वृत्तसंस्था)
पवार कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे खासदार पार्थ पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. पार्थ पवार यांचा विवाह कायनात धार यांच्यासोबत होणार असून, 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे हा विवाहसोहळा पार पडणार आहे. यापूर्वी 29 जुलै 2026 रोजी अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात साखरपुडा समारंभ पार पडणार असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी दिली आहे.
पार्थ पवार यांच्या विवाहासंदर्भात समाजात विविध धार्मिक समजुती आणि शंका व्यक्त केल्या जात होत्या. विशेषतः कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर एका वर्षाच्या आत विवाह करणे आवश्यक असते, अन्यथा पुढील तीन वर्षे विवाह करता येत नाही, अशी समजूत अनेक ठिकाणी प्रचलित आहे. या पार्श्वभूमीवर या विषयावर अधिकृत मार्गदर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी करवीर पीठाचे पूज्य शंकराचार्य यांची भेट घेतली.
शंकराचार्यांशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर विवाहासंदर्भातील धार्मिक शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी शंकराचार्यांनी स्पष्ट केले की, कुटुंबातील वडिलांचे निधन झाले असले तरी धर्मशास्त्रानुसार आवश्यक विधी आणि संस्कार योग्य पद्धतीने पार पाडणे महत्त्वाचे आहे. मात्र एका वर्षाच्या आतच विवाह करणे बंधनकारक असल्याचा कोणताही धार्मिक नियम नाही. त्यामुळे या संदर्भात समाजात असलेला गैरसमज दूर करण्याची गरज आहे.
याबाबत माहिती देताना उमेश पाटील म्हणाले, “शंकराचार्यांनी स्पष्ट केले आहे की, आई-वडिलांच्या निधनानंतर धर्मशास्त्रानुसार आवश्यक ते सर्व विधी व संस्कार योग्य प्रकारे पार पाडणे गरजेचे असते. मात्र, एका वर्षाच्या आतच विवाह केला पाहिजे, असे कोणतेही बंधन नसते. त्यामुळे याबाबतीत कोणताही गैरसमज बाळगण्याचे कारण नाही.”
उमेश पाटील यांनी सांगितले की, करवीर शंकराचार्य पीठाचा छत्रपती शाहू महाराजांशी ऐतिहासिक संबंध असल्याने विवाहासंदर्भातील रूढी, परंपरा आणि धार्मिक समजुतींबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शंकराचार्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यानंतर पार्थ पवार यांच्या विवाहाची तारीख आणि स्थळ अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्यात पार्थ पवार आणि कायनात धार यांनी एकत्र उपस्थिती लावल्याने त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह दोघेही या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांच्या विवाहाबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. आता या चर्चांवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले असून, 29 जुलै 2026 रोजी साखरपुडा आणि 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे विवाह होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
उमेश पाटील यांनी यावेळी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पार्थ पवार यांच्या होणाऱ्या पत्नी कायनात धार या मूळच्या चंदीगड येथील असून सध्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही माध्यमांमध्ये त्यांच्या नावाबाबत तसेच जन्मस्थळाबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत होती. त्यामुळे वस्तुस्थिती जनतेसमोर यावी, यासाठी ही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पवार कुटुंबातील या विवाहसोहळ्याकडे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले असून, बारामतीत होणाऱ्या या शाही विवाहाची तयारी आता लवकरच सुरू होणार आहे.

