(पंढरपूर / वृत्तसंस्था)
आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील चौथे आणि अखेरचे गोल रिंगण तसेच उभे रिंगण गुरुवारी पंढरपूर तालुक्यातील बाजीराव विहीर येथे लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडले. टाळ-मृदंगाच्या निनादात, “माऊली… माऊली…” आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. रिंगण सोहळ्याचे अलौकिक दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या विविध संतांच्या पालख्या गुरुवारी पंढरपूरच्या वेशीवरील वाखरी येथे दाखल झाल्या. त्यापूर्वी दुपारी भंडीशेगाव येथून निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने प्रस्थान करत बाजीराव विहीर परिसरात पोहोचला. याच ठिकाणी उभे आणि गोल रिंगणाचा भव्य सोहळा रंगला.
उभ्या रिंगणासाठी भाविकांची प्रचंड गर्दी
बाजीराव विहिरीजवळील उड्डाणपुलाच्या शेजारी असलेल्या सर्व्हिस रस्त्यालगत उभ्या रिंगणाचे आयोजन करण्यात आले होते. माऊलींच्या अश्वाचे दर्शन घेण्यासाठी आणि रिंगणाचा दिव्य सोहळा अनुभवण्यासाठी वारकरी गुरुवार सकाळपासूनच मोठ्या संख्येने येथे जमा झाले होते. दुपारी सुमारे साडेतीन वाजता उभे रिंगण उत्साहात पार पडले. रिंगण सुरू होताच वारकऱ्यांनी टाळ, मृदंग, वीणा आणि अभंगांच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून टाकला.
अखेरच्या गोल रिंगणाने भाविकांचे डोळे भरून आले
उभे रिंगण पूर्ण झाल्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा शेजारील मोकळ्या मैदानात अखेरच्या गोल रिंगणासाठी दाखल झाला. वाखरी पालखी तळावर आलेल्या विविध संतांच्या दिंड्यांमधील हजारो वारकरी या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी बाजीराव विहीर परिसरात दाखल झाले होते.
सायंकाळी साडेपाच वाजता माऊलींची पालखी रिंगणस्थळी पोहोचताच वातावरण भक्तिमय झाले. सेवेकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर खांद्यावर पालखी नाचवत रिंगणाला सुरुवात केली. मानाच्या दिंड्यांनी झेंडा घेऊन रिंगणात प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर अश्वस्वारांनी पारंपरिक पद्धतीने रिंगण पूर्ण करताच उपस्थित लाखो वारकरी “माऊली… माऊली…” आणि “पांडुरंग… पांडुरंग…”च्या जयघोषात तल्लीन झाले. या दिव्य सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
वाखरीत पालखीचा मुक्काम
बाजीराव विहिरीतील सोहळ्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवरील वाखरी पालखी तळावर मुक्कामासाठी दाखल झाला. सोलापूर जिल्ह्यातील दुसरे उभे रिंगण आणि चौथे तसेच अखेरचे गोल रिंगण पूर्ण झाल्यानंतर पालखी वाखरी येथे विसावली. आज शुक्रवार (२४ जुलै) रोजी वाखरी येथून पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून, विठ्ठलाच्या नगरीत प्रवेश करण्याच्या आनंदात वारकरी भक्त “पांडुरंग हरी, विठ्ठल हरी”च्या अखंड नामस्मरणात रमले आहेत.
वारकऱ्यांसाठी प्रशासनाकडून व्यापक सुविधा
लाखो वारकरी भाविकांच्या सोयीसाठी वाखरी पालखी तळावर प्रशासनाने व्यापक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी, सुलभ शौचालये, स्नानगृहे, आरोग्य सुविधा, आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, मुख्यमंत्री आरोग्य रथ, हिरकणी कक्ष, मुख्यमंत्री वारकरी निवारा कक्ष (जर्मन हॅंगर), मोबाईल चार्जिंग सुविधा, मसाज सेवा तसेच स्वच्छता आणि कडक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. वारकरी भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी चोवीस तास कार्यरत आहेत.
आषाढी वारीचा अंतिम टप्पा आता सुरू झाला असून, लाखो वारकऱ्यांच्या विठ्ठल भेटीची ओढ अधिकच वाढली आहे. पंढरपूरच्या वेशीवर पोहोचलेल्या माऊलींच्या पालखीमुळे संपूर्ण वाखरी परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला असून, आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

