(सुरत)
धुळे–सुरत महामार्गावर मंगळवारी (2 जून) सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात उवा आणि मानेकपोर गावादरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) दोन एसटी बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. . महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या दोन्ही बसचे क्रमांक MH-18-BZ-1258 आणि MH-20-BL-3390 असे आहेत. या दोन्ही बस महाराष्ट्रातील आहेत.
अपघात इतका भीषण होता की एका बसचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला, तर दुसरी बस रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. धक्कादायक बाब म्हणजे पलटी झालेली बस सीएनजीवर चालणारी असल्याने इंधन गळती होऊन बसला आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
टँकर टाळण्याच्या प्रयत्नात घडला भीषण अपघात
प्राथमिक माहितीनुसार, धुळे–सुरत महामार्गावर बारडोलीजवळ एक टँकर पलटी झाला होता. या टँकरला धडक टाळण्यासाठी मागून येणाऱ्या महाराष्ट्र पासिंगच्या एसटी बस चालकाने अचानक बस वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बसवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर गेले. याचवेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या दुसऱ्या एसटी बसला या बसची जोरदार धडक बसली. समोरासमोर झालेल्या या धडकेत दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले.
CNG बसला आग; प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरला
अपघातानंतर रस्त्याखाली गेलेल्या सीएनजी बसमधून इंधन गळती सुरू झाली आणि काही क्षणांतच बसने पेट घेतला. आग वेगाने पसरल्याने अनेक प्रवासी बसमध्ये अडकले. प्रवाशांच्या किंकाळ्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. त्यानंतर बारडोली अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून सुमारे अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
या भीषण अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी अपघाताचा पंचनामा सुरू केला असून नेमका अपघात कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे धुळे–सुरत महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

