(रत्नागिरी / वार्ताहर)
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत गुरुवार, १६ जुलै २०२६ रोजी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांसाठी पंचायत विकास आराखडा (सन २०२६-२७) तयार करण्याबाबत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. १६ व्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गुणवत्तेवर आधारित पंचायत विकास आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने व्यंकटेश हॉटेल, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे हे प्रशिक्षण संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे होत्या. त्यांनी विकास प्रक्रियेत लोकप्रतिनिधींसाठी प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत प्रभावी नियोजनासाठी अशा प्रशिक्षणांची गरज असल्याचे सांगितले.
या प्रशिक्षणात चक्रभेदी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वैदेही सावंत यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मनरेगा अंतर्गत बिनखर्चिक भागीदार संस्था म्हणून चक्रभेदी फाउंडेशनची निवड झाल्याची माहिती दिली. तसेच मनरेगा योजनेतील अलीकडील बदल आणि विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याशिवाय, यशदा राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर म्हणून तसेच विविध लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिल्याचा अनुभव त्यांनी उपस्थितांसोबत शेअर केला. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वप्रथम समाजाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडविणे आवश्यक असून, त्यासाठी व्यापक जनप्रबोधनाचे कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ‘शिव्यामुक्त समाज अभियान’ या उपक्रमाची माहितीही त्यांनी दिली.
प्रशिक्षणाच्या समारोपावेळी जिल्हा परिषद सदस्य नेहा माने आणि थेराडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चक्रभेदी फाउंडेशनच्या स्वयंसेविका दिपाली गावडे उपस्थित होत्या. या प्रशिक्षणास रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच पंचायत समिती सभापती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

