( रत्नागिरी /प्रतिनिधी )
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या नवीन जिल्हा कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या माध्यमांतून जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही विभागाची जंबो कार्यकारणी नुकतीच प्रदेश कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदावर सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी गौतम गमरे यांना संधी देण्यात आली आहे. तर उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाची दुसऱ्यांदा अण्णा जाधव यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच दक्षिण जिल्हाच्या मावळत्या कार्यकारिणीतील जिल्हाध्यक्ष रुपेंद्र जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी नवीन कार्यकारिणी निवडताना आपल्या पक्षाच्या नावातील ‘वंचित’ आणि ‘बहूजन’ घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय कार्यकारिणीत सेवानिवृत्त अधिकारी, निष्ठावंत, काम करणाऱ्या आणि पक्षाला वेळ देणाऱ्या तरुणांना स्थान देत पक्षाला सुशिक्षित प्रतिमा देण्याचा प्रयत्न केला आहे. रत्नागिरी तालुक्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र कोकरे, महासचिव मुकुंद सांवत या दोघांना बढती देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी प्रदेश स्तरावरून रत्नागिरी जिल्ह्याच्या दोन्ही विभागातील कार्यकारणी नियुक्तीचे पत्रक जाहीर करण्यात आले आहे. रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याची पूर्वी कार्यरत असलेली कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्याचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग 2024 लोकसभेचे वंचितचे उमेदवार काका जोशी यांना समाधानकारक मत मिळाली नसल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ॲड. प्रकाश आंबेडकरांनी पश्चिम महाराष्ट्रासह कोकण विभागात लक्षकेंद्रित केल्याचे दिसून येत आहे. विधानसभेपूर्वी दक्षिण जिल्हा कार्यकारणी बदलण्याचा निर्णय घेतल्याने आगामी विधानसभेला मतदानाचा टक्का वाढविण्याची संधी पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाली आहे.
अशी आहे वंचित बहुजन आघाडीची नूतन दक्षिण जिल्हा कार्यकारिणी
लवेश कांबळे, रवींद्र कोकरे, चेतन नाईक, सुभाष जाधव, विठ्ठल गोरूले, दामोदर कांबळे, शंकर लाड ,श्रीपद मोहिते, अशोक ताम्हणकर, अनंत मांडवकर ,विठ्ठल जाधव, तेजस कांबळे अशा बारा जणांची जिल्हा उपाध्यक्ष पदावर निवड केली आहे. सहसचिव पदावर राजेंद्र कांबळे, दिनेश वैताळे, स्वप्नील धनावडे तर संपर्कप्रमुख पदावर राकेश कांबळे , प्रमुख संघटक एस एस कांबळे, अनंत सावंत अशा वीस जणांची जंबो कार्यकारणी प्रदेश स्तरावरून जाहीर करण्यात आली आहे.