(राजापूर / तुषार पाचलकर)
येथील श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयात ‘मराठी भाषा व वाङ्मय मंडळ’ आणि कोकण मराठी साहित्य परिषद, ‘युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग शाखा, राजापूर’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रावणधारा’ निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन उत्साहात पार पडले. महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या काव्यसंमेलनात विद्यार्थी आणि निमंत्रित कवींनी श्रावण व पावसावर आधारित कविता सादर करत उपस्थितांना काव्यरसात चिंब केले.
दीपप्रज्वलन आणि कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. दक्षिण कोकण युवाशक्ती प्रमुख श्री. अरुण मोर्ये यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले, तर संस्थेचे सरचिटणीस श्री. नरेश पाचलकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक श्री. प्रकाश सकपाळ, संस्था सदस्य श्री. चंद्रकांत लिंगायत, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, डॉ. ए. डी. पाटील, मराठी भाषा व वाङ्मय मंडळ प्रमुख डॉ. बी. टी. दाभाडे, ज्येष्ठ कवी व चित्रकार श्री. हेमंत लब्दे, श्री. नितीश खानविलकर, श्री. नागेश साळवी, श्री. प्रमोद जाधव, सौ. मानसी सुर्वे, कु. स्नेहल चव्हाण, कु. श्रुती फुटक, कु. मालवी होरंबे, ज्येष्ठ पत्रकार श्री. सुरेश गुडेकर, नारकर वाचनालयाचे कार्यवाहक श्री. विनायक खानविलकर, ग्रंथपाल श्री. विठोबा चव्हाण, श्री. कमलाकर धुल आदी कवी व मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकातून डॉ. बी. टी. दाभाडे यांनी काव्यसंमेलनाचे स्वरूप आणि उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर श्री. प्रकाश सकपाळ आणि श्री. नरेश पाचलकर यांनी मनोगत व्यक्त करून काव्यसंमेलनास शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन सत्रानंतर साहिल नार्वेकर, कु. निर्मिती जाधव, कु. सारिका गुरव, कु. सिद्धी चव्हाण, राज व्हावळे, रितेश पवार, कु. अनुजा गुरव, कु. तुलसी वरेकर, संस्कार नारकर आणि कु. श्रुती कलमष्टे या विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर केल्या. या स्पर्धेत कु. निर्मिती जाधव हिने प्रथम, कु. सिद्धी चव्हाण हिने द्वितीय, तर कु. तुलसी वरेकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन विजेत्या कवींना गौरविण्यात आले.
यानंतर श्री. हेमंत लब्दे, श्री. नरेश पाचलकर, श्री. अरुण मोर्ये, डॉ. विकास पाटील, श्री. नितीश खानविलकर, श्री. नागेश साळवी, श्री. प्रमोद जाधव, सौ. मानसी सुर्वे, कु. स्नेहल चव्हाण, कु. श्रुती फुटक आणि कु. मालवी होरंबे यांनी श्रावण व पावसावर आधारित कविता सादर केल्या. त्यांच्या काव्य सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहभागी सर्व कवींना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पेन देऊन सन्मानित करण्यात आले.
काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. विकास पाटील यांनी केले, तर श्री. नितीश खानविलकर यांनी आभार मानले. या काव्यसंमेलनाला परिसरातील काव्यरसिकांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


