(रत्नागिरी / वार्ताहर)
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईचा निषेध आणि देशभरातील पेपरफुटीच्या घटनांविरोधात रत्नागिरीत आज (गुरुवारी) विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर पाठिंबा देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
मोर्चामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, तालुका व शहर पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना दत्ताजी कदम यांनी पेपरफुटीच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “गरीब आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थी अथक परिश्रम करून भवितव्य घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे त्यांच्या भविष्याशी खेळ केला जात आहे. शांततेने न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार होणे ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत,” असे ते म्हणाले.
उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांनीही सरकारवर टीका करत, “पेपरफुटी रोखण्यात अपयश आले असताना न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करणे योग्य नाही. दिल्लीतील पोलीस कारवाईचा आम्ही निषेध करतो. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही. रत्नागिरीतील शिवसेना विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात त्यांच्यासोबत राहील,” असे सांगितले.
मारुती मंदिर परिसर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आंदोलनकर्त्यांनी विविध घोषणाबाजी करत पेपरफुटीच्या घटनांविरोधात संताप व्यक्त केला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

