(गणपतीपुळे / वैभव पवार)
गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचही तरुणांचे मृतदेह अखेर शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. पोलीस, कोस्ट गार्ड, जीवरक्षक, स्थानिक मच्छिमार आणि नागरिकांनी युद्धपातळीवर राबविलेल्या शोधमोहीमेनंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. या हृदयद्रावक घटनेमुळे गणपतीपुळे परिसरासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन गावावर शोककळा पसरली आहे.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- आदित्य संतोष राऊत (२२)
- अनिकेत बंडू हिवराळे (२०)
- आनंद राजू नरवडे (२०)
- प्रेम दीपक आदमाने (१९)
- यश रामेश्वर कांबळे (१९)
हे सर्व तरुण बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. कस्टम विभाग, कोस्ट गार्ड, स्थानिक मच्छिमारांच्या बोटी तसेच जीवरक्षकांच्या मदतीने समुद्रात व्यापक शोध घेण्यात आला. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पाचही तरुणांचे मृतदेह शोधण्यात यश आले.
या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यटकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. समुद्र खवळलेला किंवा धोकादायक असताना समुद्रस्नान टाळावे, इशारा फलक व जीवरक्षकांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि सुरक्षित अंतरावरूनच समुद्राचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

