(राजापूर / वार्ताहर)
राजापूर शहरातील गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. व्यापाऱ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या जागांवरच विक्रीची व्यवस्था केल्याने तसेच शिवाजीपथसह प्रमुख मार्गाचा एक भाग वाहतुकीसाठी मोकळा ठेवल्याने यंदाच्या बाजारात वाहतूक कोंडी टळली. बाजारातील सुसूत्रतेमुळे नागरिक, व्यापारी, ग्राहक आणि वाहनचालकांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.
आज (गुरुवारी) सकाळी मुख्याधिकारी अभिजित कुंभार, पोलीस निरीक्षक अमित यादव, नगर परिषदेचे आरोग्य सभापती सुलतान ठाकूर, पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे, कार्यालय अधीक्षक जितेंद्र जाधव, नगरसेवक तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी बाजारात उपस्थित राहून व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधला. व्यापाऱ्यांना नियोजित जागांवर बसविणे, वाहतुकीचे नियोजन आणि पार्किंगची व्यवस्था यावर विशेष भर देण्यात आला.
गेल्या काही आठवड्यांपासून आठवडा बाजारातील बेशिस्त, काही व्यापाऱ्यांची मनमानी आणि शिवाजीपथ ते गणेशघाट मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने या मार्गावर व्यापाऱ्यांना बसण्यास निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला होता. त्याला काही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला होता.
यानंतर २० जुलै रोजी झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांच्या मागणीचा विचार करून गणेशघाट ते शिवाजीपथ मार्गावर कोळवणकर यांच्या घरामागील रॅम्पपर्यंत एका बाजूला तात्पुरत्या स्वरूपात विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्याचवेळी शिवाजीपथ ते नवजीवन हायस्कूलपर्यंतचा रस्ता ‘नो पार्किंग’ क्षेत्र घोषित करून व्यापाऱ्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले.
या निर्णयाची अंमलबजावणी आज करण्यात आली. मुख्याधिकारी अभिजित कुंभार आणि पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सकाळी साडेसहा वाजल्यापासून पथकासह बाजारात उपस्थित राहून संपूर्ण नियोजनाची अंमलबजावणी केली. भुईभाड्यानुसार व्यापाऱ्यांना निश्चित जागा उपलब्ध करून देण्यात आली. अधिक जागा व्यापणाऱ्या विक्रेत्यांना नियमानुसार जागा कमी करण्यास सांगण्यात आले, तर रस्त्यावर बसलेल्या इतर विक्रेत्यांनाही बाजार परिसरात योग्य जागा देण्यात आली.
व्यापाऱ्यांच्या वाहनांसाठी नवजीवन हायस्कूल परिसर तसेच वरच्या पेठेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे मुख्य रस्ता मोकळा राहिल्याने वाहनचालक, पादचारी आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.
आठवडा बाजारात सुसूत्रता आणण्यासाठी व्यापाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मुख्याधिकारी अभिजित कुंभार आणि पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सर्व व्यापारी, नागरिक आणि वाहनचालकांचे आभार मानले.
यावेळी शिवसेना गटनेते ॲड. राहुल तांबे, नगरसेवक सिद्धांत जाधव, दिलीप चव्हाण, प्रेरणा नार्वेकर, उर्मिला बाकाळकर, साजिया काझी, सान्वी रावण, बांधकाम विभागाचे रणवीर देसाई, आरोग्य विभागप्रमुख अमित पवार, योगेश बंडगर, मुकादम राजन जाधव तसेच नगर परिषद आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

