(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल येथे आज दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. पाचल पंचक्रोशी मित्र मंडळाच्या वतीने ५१ हजार रुपयांची दहीहंडी आणि रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शिवसेना पाचल व तळवडे विभाग, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे १ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची मोठी दहीहंडी उभारण्यात आली होती. उत्सवाच्या निमित्ताने मनोरंजनासाठी मराठी ऑर्केस्ट्राचेही आयोजन करण्यात आले होते.
जबरदस्त नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि शिस्तप्रिय कामगिरीच्या जोरावर यावर्षीचा दहिकाळा उत्सव पाचलवासीयांनी उत्साहात साजरा केला. पाचल बाजारपेठेतील हॉटेल वैभवसमोरील पाचल पंचक्रोशी मित्र मंडळाच्या दहिकाळा उत्सवाला तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या दहिकाळा उत्सवाला आमदार किरण सामंत आणि शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वाताई सामंत यांनी भेट दिली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या उत्सवाला जिल्हा परिषद सदस्य सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्य अपेक्षा मासये, समीक्षा वाफेलकर, पाचल सरपंच बाबालाल फरास यांच्यासह पाचल पंचक्रोशी मित्र मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच शिवसेना, युवासेना आणि शिवसेना महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाचल पंचक्रोशी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रस्सीखेच स्पर्धेत अव्हेंजर्स तळवडे संघाने प्रथम क्रमांक पटकावला. ए वन कृषी सेवा केंद्र संघाने द्वितीय, तर पाचल गुरववाडी संघाने तृतीय क्रमांक मिळवला. दहीहंडी उत्सवातील विविध उपक्रमांमुळे पाचल बाजारपेठेत दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

