(चिपळूण / वार्ताहर)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव ‘मयूरपंख २०२६’ मध्ये मांडकी-पावलण येथील गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचा गौरव वाढवला.
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य तसेच ललित कला विभागात आपल्या कलागुणांची प्रभावी छाप पाडली. कृषी महाविद्यालय, दापोली येथे १ ते ३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
महोत्सवात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या संघाने ‘भारतीय लोकनृत्य’ या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच ललित कला प्रकारातही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. ‘ऑन द स्पॉट पेंटिंग’मध्ये कु. पियुष सलोखे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. ‘कोलॅज मेकिंग’मध्ये कु. श्रावणी कदम यांनी द्वितीय, तर ‘क्ले मॉडेलिंग’मध्ये कु. जतीन पाटणकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
‘भारतीय लोकनृत्य’ प्रकारात कु. श्रावणी भिसे, कु. श्रावणी कदम, कु. प्राजक्ता कुंभार, कु. स्वरांजली रामशे, कु. सरिता गिरी, कु. सावली लाड, कु. श्रद्धा लांबे, कु. समीक्षा पाटील आणि कु. श्रावणी सपकाळ या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामागे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे तसेच उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

