(रत्नागिरी / प्रतिनिधी)
हातखंबा बोंबलेवाडी (गिर्दा) परिसरातील घनदाट जंगलात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह सुमारे ४० ते ४५ वयोगटातील असून मृत्यू साधारणतः ४ ते ५ दिवसांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
बुधवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता हा मृतदेह जंगलात आढळून आला. याबाबतची माहिती स्थानिक पोलीस पाटलांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाला दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून, घटनास्थळी प्राथमिक तपास करून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.
मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न ग्रामीण पोलीस करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण तसेच यामागे कोणतीही संशयास्पद बाब आहे का, याचा तपास सखोलपणे सुरू आहे.
याबाबत अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.