(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील प्रसिद्ध किराणा व्यापारी अशोक सदाशिव केळकर यांचे आज शनिवारी 21 मार्च रोजी सकाळच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ७६ वर्षांचे होते.
मालगुंड पंचक्रोशीतील आबालवृद्धांमध्ये “काका” या टोपणनावाने ते प्रसिद्ध होते. त्यांनी “ब्राह्मण सभा मालगुंड” चे अध्यक्षपद ५ वर्षे भूषविले होते. तसेच सध्या ते मालगुंड येथील विठ्ठल मंदिर उत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ते स्वामी भक्त होते. त्यामुळे त्यांची श्री स्वामी समर्थांवर गाढ श्रद्धा होती. गेल्याचवर्षी त्यांचे ज्येष्ठ बंधू विनायक तथा बंडोपंत केळकर यांचे दुःखद निधन झाले. त्यापाठोपाठ केळकर कुटुंबियांवर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळल्याने संपूर्ण मालगुंड पंचक्रोशीत मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण मालगुंड बाजारपेठ बंद ठेवून स्थानिक व्यावसायिकांनी तीव्र शोक व्यक्त केला .तसेच मालगुंड बाजारपेठेतील सर्व व्यावसायिक, सामाजिक, राजकीय व विविध स्तरातील मंडळी त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या अंत्यदर्शन व अंत्ययात्रेसाठी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई व नातवंडे आहेत. तसेच एकत्र कुटुंब असल्याने त्यांचे बंधू व त्यांचे कुटुंबीय आहेत.

