(रत्नागिरी)
जिल्ह्यातील व्यावसायिक छायाचित्रकार अधिक प्रगत व तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हावेत यासाठी रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर-व्हिडिओग्राफर असोसिएशनतर्फे सातत्याने विविध प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. अल्पावधीतच संघटनेने ५०० पेक्षा अधिक मोफत कार्यशाळा आणि २०० हून अधिक वेबिनार्सचे आयोजन केले असून, याच उपक्रमाच्या पुढील भाग म्हणून ‘सिनेमॅटिक फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी’ या विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमात सन आर्ट स्टुडिओ, सारडा ग्रुप सांगली आणि सोनी इंडिया कंपनी यांचे सहकार्य लाभले असून, कार्यशाळेसाठी प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर अरुण कुमार आणि सोनी कंपनीचे प्रो स्पेशालिस्ट सुनील गवळी हे मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेत सोनी कंपनीचे नवीनतम कॅमेरे, सिनेमॅटिक फोटोग्राफीतील आधुनिक तंत्र, विविध ट्रिक्स व टेक्निक्स यांची माहिती दिली जाणार असून, मॉडेलसोबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचे सादरीकरणही करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा मर्यादित छायाचित्रकारांसाठी असणार असून, सहभागासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. कार्यशाळेचे आयोजन दोन टप्प्यांत करण्यात आले असून, ३१ जुलै रोजी चिपळूण तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या सहकार्याने हॉटेल रिम्झ, वालोपे येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत, तर १ ऑगस्ट रोजी रत्नागिरी तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या सहकार्याने हॉटेल सी फॅन, मांडवी येथे सकाळी १० ते ५ या वेळेत कार्यशाळा होणार आहे.
जिल्ह्यातील इच्छुक व्यावसायिक छायाचित्रकारांनी त्वरित नावनोंदणी करून या दुर्मिळ संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर-व्हिडिओग्राफर असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. तसेच अशा उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होण्यासाठी आणि इतर सुविधा मिळवण्यासाठी संबंधित तालुका असोसिएशनचे सभासदत्व घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अथवा तालुका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.