[ रत्नागिरी/ प्रतिनिधी ]
मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील ‘श्रद्धा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’मधील सोनोग्राफी सेंटरवर जिल्हास्तरीय पथकाने धडक ‘डिकॉय’ कारवाई करत सोनोग्राफी मशीन सील केले. PCPNDT कायद्यातील नियमांना हरताळ फासल्याचे गंभीर प्रकार तपासणीत समोर आल्याने प्रशासनाने ही कारवाई केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
जिल्हास्तरीय पथकाने १ सप्टेंबर रोजी या केंद्रात डिकॉय केस केली. तपासणीदरम्यान केंद्रासाठी नोंदणीकृत तज्ज्ञ डॉ. सुमन व्यास (स्त्रीरोगतज्ज्ञ) उपस्थित नसताना, PCPNDT कायद्यानुसार सोनोग्राफी करण्यास सक्षम नसलेल्या डॉ. श्रद्धा आंबेकर (BAMS) या सोनोग्राफी करताना आढळून आल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. याशिवाय, नोंदणीकृत तज्ज्ञ डॉक्टर गैरहजर असतानाही त्यांच्या नावाचा शिक्का वापरून अहवालावर स्वाक्षरी केली जात असल्याचे तपासणीत निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकारामुळे सोनोग्राफी केंद्रातील कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
केंद्रातील कागदपत्रांची छाननी करताना आणखी एक बाब समोर आली. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून नोंद असलेल्या डॉ. सुमन व्यास या पुरुष रुग्णांचीही सोनोग्राफी करत असल्याचे कागदपत्रांवरून निष्पन्न झाल्याचे जिल्हास्तरीय पथकाने नमूद केले आहे. PCPNDT कायद्यात सोनोग्राफी केंद्रांच्या कामकाजाबाबत स्पष्ट नियम आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यानंतर प्रशासनाने कोणतीही कुचराई न करता संबंधित सोनोग्राफी मशीन सील केले.
नियमभंगावर प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राइक’
सोनोग्राफीसारख्या संवेदनशील वैद्यकीय प्रक्रियेत पात्रता, नोंदणीकृत तज्ज्ञांची उपस्थिती आणि अधिकृत नोंदी यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या प्रकरणातील कथित गैरप्रकारांमुळे आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. डिकॉय कारवाईत समोर आलेल्या बाबींच्या आधारे प्रशासनाने तातडीने मशीन सील करून नियमभंगाला लगाम घालण्याची भूमिका घेतली आहे. पुढील प्रशासकीय व कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

