( रत्नागिरी / प्रतिनिधी )
गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात वाटद पंचक्रोशीत एमआयडीसीविरोधी आंदोलनाला अधिक धार आली असतानाच, या आंदोलनाची झलक दर्शविणारा बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याची घटना घडली. १९ सप्टेंबरच्या मध्यरात्री वाटद-कोलतेवाडी येथे ग्रामस्थांनी लावलेला विरोधी बॅनर फाडून टाकल्याने ग्रामस्थांमध्ये संताप उसळला असून पंचक्रोशीतील वातावरण ढवळून निघाले आहे.
सरकारकडून दोन हजार दोनशे एकर जमीन संपादित करून वाटद एमआयडीसी उभारण्याचा डाव रचला जात आहे. त्यापैकी तब्बल एक हजार एकर जमीन रिलायन्स डिफेन्सकडे देण्यात येणार असल्याची माहिती बाहेर आली आहे. उर्वरित १२०० एकर जमिनीबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही. स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात रणशिंग फुंकले असून आता परदेशी चाकरमान्यांचाही या आंदोलनात सक्रिय सहभाग असल्याने एमआयडीसीविरोधातील लढ्याला अधिक जोर मिळत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घराघरावर ‘एकच जिद्द, एमआयडीसी रद्द; गणराया, हे गावावर आलेले विनाशकारी संकट कायमस्वरूपी हद्दपार होऊ दे!’ अशी आर्त प्रार्थना झळकवणारे बॅनर लोकांनी घरादारावर लावले होते. या बॅनरमुळे एमआयडीसी समर्थकांची बोलती बंद झाली होती. मात्र कोलतेवाडीत लावलेला बॅनर मध्यरात्री अज्ञात इसमाने फाडल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. बॅनर फाडला तरी आमचा निर्धार मोडणार नाही. एमआयडीसीविरोधी लढा पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने उभारला जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
हीच सर्वसामान्य जनता त्यांच्या न्याय हक्कासाठी…
वाटद एमआयडीसी विरोधातील वाटद कोलते स्टॉपवरील हा बॅनर अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात आला. ज्यांनी कोणी हे कृत्य केलेले आहे त्यांचा जाहीर निषेध! आमचा संघर्ष हा वैचारिक, संविधानात्मक आहे. त्यामुळे जर कुणाला वाटत असेल की अशा पद्धतीने बॅनर फाडून आम्ही फार मोठी क्रांती केली आहे. तर त्यांच्या माहिती करिता या अशा सामाजिक अशांतता प्रस्तापित करणाऱ्या बांडगुळांचा शोध चालू आहे. येत्या काही दिवसात हीच सर्वसामान्य जनता त्यांच्या न्याय हक्कासाठी यांचे कपडे फाडल्या शिवाय राहणार नाही.
– प्रथमेश गावणकर (वाटद एमआयडीसी संघर्ष समिती प्रमुख)

