(संगमेश्वर / एजाज पटेल)
समुद्राशी रोज दोन हात करत आपल्या संसाराचा गाडा ओढणारा आणि लेकींच्या डोळ्यांत मोठी स्वप्ने पाहणारा एक कष्टकरी बाप… आणि एका क्षणात सर्व काही संपवून टाकणारी नियतीची निर्दयी चाल. जयगडच्या अथांग समुद्राने फुणगूस थुळवाडी येथील अरविंद गोविंद नितोरे (वय ४७) यांना कायमचे आपल्या कवेत घेतले आणि मागे राहिली ती दोन निष्पाप लेकींची पोरकी दुनिया.
१३ एप्रिलचा दिवस अरविंद यांच्या आयुष्यातला शेवटचा ठरला. बोटीवर काम सुरू होते. लाटा नेहमीप्रमाणे धडाका देत होत्या, पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडणार होतं. काही क्षणांसाठी सहकारी दूर गेला… आणि त्या काही क्षणांतच नियतीने आपला डाव साधला. अरविंद यांचा तोल गेला आणि ते समुद्रात कोसळले. ज्या समुद्राने त्यांना आयुष्यभर उदरनिर्वाह दिला, त्याच समुद्राने त्यांना कायमचं हिरावून नेलं.
अरविंद नितोरे यांच्यासाठी समुद्र म्हणजे केवळ पाणी नव्हतं तर
तोच त्यांचा उदरनिर्वाह होता, त्यांची दुनिया होती. पण त्याच समुद्राने एका क्षणात त्यांना आपल्या कुशीत घेतलं होतं.
शोध सुरू झाला. जाळी टाकली गेली. आणि नियतीची क्रूर विडंबना अशी की, ज्या जाळ्याने त्यांनी आयुष्यभर मासे पकडले, त्याच जाळ्यात त्यांचा निश्चल देह अडकलेला सापडला. त्या क्षणी समुद्र शांत होता… पण एका कुटुंबाच्या आयुष्यात वादळ उठलं होतं.
घरात १७ वर्षांची श्रावणी आणि फक्त ७ वर्षांची आरोही… एका बापाच्या कुशीत वाढणारी दोन कोवळी स्वप्नं…“माझ्या पोरी शिकतील… मोठ्या होतील…” या एका आशेवर अरविंद रोज लाटांशी झुंजत होते. गरिबी होती, कष्ट होते, पण स्वप्नं होती.
आज त्या दोन्ही लेकींच्या डोक्यावरचं छत्रच हरपलं आहे.
मोठी श्रावणी आता परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे… पण लहानगी आरोही अजूनही वाट पाहत आहे, “बाबा कधी येणार?” एका माउलीचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य, घरात त्यांची वाट पाहणारी पत्नी…
दररोजप्रमाणे त्या दिवशीही त्या वाट पाहत होत्या, “माझा माणूस येईल… थकलेला असेल… पण हसत घरात पाऊल ठेवेल…” पण त्या दिवशी दार ठोठावणारा माणूस नव्हता… आली ती केवळ दुःखद बातमी. क्षणात संसार उध्वस्त झाला. कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं… आणि आयुष्यभरासाठी एकटेपणाचा अंधार उरला.
१३ एप्रिल रोजी जयगड किनाऱ्यावर ही घटना घडली. अरविंद नितोरे हे बोटीवर काम करत असताना त्यांचा सहकारी सखाराम मासेकर काही वेळासाठी पाणी आणण्यासाठी गेला होता. याच दरम्यान अरविंद यांचा तोल जाऊन ते समुद्रात पडले. काही वेळाने सहकारी परतल्यानंतर शोध सुरू करण्यात आला; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
शोधमोहीम राबवून अखेर त्यांचा मृतदेह बोटीच्या परिसरातच सापडला. त्यांना तत्काळ वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कुटुंबावर कोसळलेले संकट
अरविंद नितोरे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली, १७ वर्षीय श्रावणी व ७ वर्षीय आरोही असा परिवार आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ते मेहनत करून मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबाचा मुख्य आधार हरपला आहे.
या घटनेमुळे फुणगूस परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, त्यांना मदतीची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या प्रकरणाची नोंद जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
एका बापाची कहाणी इथे संपली…
पण दोन लेकींचा संघर्ष आता सुरू झाला आहे.

