(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची मंगळवारी (दिनांक १४ ऑक्टोबर) भेट घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील अपंग आणि दिव्यांग बांधवांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महासंघाच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांच्या सुविधा, रोजगार संधी, शिक्षणातील अडचणी, तसेच शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत आपली व्यथा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली. शासनाचे निर्णय कागदावरच राहतात, प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही, अशी खंत यावेळी अपंग बांधवांनी व्यक्त केली. या समस्यांकडे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून लक्ष देण्याचे आश्वासन दिले. तसेच दिव्यांग बांधवांना शासनाच्या सर्व योजना आणि सुविधा प्रत्यक्ष लाभाव्यात यासाठी प्रशासन स्तरावर विशेष लक्ष देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
महासंघाच्या जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यातही दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांवर सतत संवाद ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. या भेटीच्या निमित्ताने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक हालचाल सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे सचिव नंदकुमार कांबळे, उपाध्यक्ष गणपत ताम्हणकर, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास सावंत, सदस्य विजय कांबळे, आकाश कांबळे, अतुल कांबळे आदी उपस्थित होते.

