(रायगड)
रायगड जिल्ह्यात स्वस्तात खरे सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी राजस्थानमधील पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 मे रोजी आरोपींनी फिर्यादीला कमी दरात खरे सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी विश्वास संपादन करून फिर्यादीकडून तब्बल 15 लाख रुपये घेतले. मात्र व्यवहारानंतर खरे सोन्याऐवजी बनावट दागिने देऊन आरोपी फरार झाले होते.
या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 75/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318(2), 318(4) आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजस्थानमधील आरोपी अटकेत
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये केसाराम सावजी बागरी, मोहनलाल गंगाराम परमार, राजू शिलाराम राठोड, अनिल हरिराम परमार आणि जितेंद्रकुमार मोहनलाल परमार यांचा समावेश आहे. सर्व आरोपी मूळचे राजस्थान राज्यातील जालोर जिल्ह्यातील असून काही आरोपी सध्या रायगड जिल्ह्यात वास्तव्यास होते.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने आरोपींचा माग काढला. आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून काही जणांनी व्यवहार केला तर इतरांनी पळून जाण्यास मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी रोहा तालुक्यातील किल्ला परिसरातून आरोपींना ताब्यात घेत अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना स्वस्त सोन्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. सोन्याची खरेदी नेहमी अधिकृत आणि विश्वासार्ह ज्वेलर्सकडूनच करावी तसेच कोणतीही फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

